केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी पहाटेच्या सुमारास मोठी कारवाई केली. या प्रकरणामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसहीत आठ जणांना एनसीबीने अटक केली होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्या क्रूझवर जाऊन तपासणी सुरु करत ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत.
“राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना २३ ऑगस्ट १९८५ रोजी नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रापिस सब्सटंन्स अॅक्ट (NDPS) कायदा लागू करण्यात आला. हा कायदा लागू करण्यामागे राजीव गांधी यांची जी इच्छा होती की देशाला नशामुक्त करण्यात यावं. यासाठी अंमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) करण्यात आलं. या कायद्यानुसार राज्यांनाही अधिकार देण्यात आले. फक्त पोलिसांना अधिकार दिले तर अनेक राज्यांमधले प्रकरण असेल तर कारवाईसाठी समस्या निर्माण होईल म्हणून केंद्रीय संस्था स्थापन करण्यात आली. ३६ वर्षांपासून ही संस्था या देशात काम करत आहे. या तपास यंत्रणेने अनेक प्रकारच्या कारवाया करत ड्रग्ज रॅकेट उद्धवस्त केले आहेत. या संस्थेचे कामकाज ३६ वर्षे संशयाखाली नव्हते. या देशाचे सर्व जागरूक नागरिक, सर्व राजकीय पक्ष या संस्थेचे सन्मान करत आले आहेत,” असे नवाब मलिक यांनी म्हटले.




“गेल्या एका वर्षभरापासून सर्व माध्यमांनी एनसीबीसाठी आपले प्रतिनिधी तयार करून ठेवले आहेत. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बिहारमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आणि सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात आले. त्यानंतर ड्रग्समुळे त्यांची हत्या केली गेली अशा बातम्या येऊ लागल्या. तेव्हापासून बातम्या पेरल्या गेल्या. बॉलिवूडला बदनाम करण्यात आले. त्यानंतर कलाकारांना समन्स देऊन बोलावण्यात आले. त्यानंर असा समज निर्माण केला की संपूर्ण बॉलिवूड हे ड्रग्ज रॅकेटचे नेक्सस झाले,” आहे असे मलिक म्हणाले.
आर्यन खान सोबत सेल्फी व्हायरल झालेला एनसीबीचा अधिकारी नाही
“याच मालिकेत ३ तारखेच्या संध्याकाळी क्रूझवर एनसीबीने छापा टाकला. त्यानंतर एएनआयने आपल्या माध्यमातून काही व्हिडीओ दाखवण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये एनसीबीने ज्यांना ताब्यात घेतले होते त्यांचे फूटेज होते. त्याआधी झोनल संचालक यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. एका व्हिडीओमध्ये एक अधिकारी आर्यन खानला एनसीबीच्या ऑफिसमध्ये घेऊन जात असल्याचे दिसले. त्यांनर त्याच व्यक्तीचा आर्यन सोबत सेल्फी व्हायरल झाला. त्यानंतर एएनआयने दिल्लीच्या अधिकाऱ्यांकडून एक बातमी दाखवली की हा एनसीबीचा अधिकारी नाही. त्यामुळे ही व्यक्ती कोण हा प्रश्न निर्माण होत आहे. हा एनसीबीचा अधिकारी नाही तर आर्यन खानला तो कार्यालयात कसा घेऊन गेला? याचे उत्तर एनसीबीला द्यावे लागेल. एएनआयच्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये अरबाज मर्चंटला घेऊन जाणारी व्यक्ती खोटी आहे. पहिल्या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव केपी गोसावी आहे तर दुसऱ्या व्यक्तीचे नाव मनिष भानुषाली आहे. मनिष भानुषाली हा भाजपाचा उपाध्यक्ष आहे. मनिष भानुषालीचे फोटो पंतप्रधान मोदी आणि अमित शाह, देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासोबत आहेत. एनसीबीला सांगावे लागेल की त्यांचे आणि एनसीबीचे काय संबंध आहेत?” असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
एनसीबीने आणखी दोघांना ताब्यात घेण्याचे षडयंत्र आखले
“एनसीबीने दावा केला आहे की आम्ही क्रूझवर छापा मारला. तीन दिवस नियोजन करण्यात आले. २६ अधिकाऱ्यांद्वारे कारवाई केली गेली. एनसीबीने ८ ते १० लोकांना ताब्यात घेतल्याचे म्हटले होते. त्यानंतर ८ जणांना ताब्यात घेतल्याचे म्हटले. १० लोक असतील तर त्यातील दोघांना सोडले असेल. आठ लोकांनाच ताब्यात घेण्यात आले होते पण एनसीबीने आणखी दोघांना ताब्यात घेण्याचे षडयंत्र आखले होते,” असे मलिक म्हणाले.
भाजपा महाराष्ट्र सरकार, मुंबईच्या बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी बनावट प्रकरणे तयार करत आहे
“जेव्हा हे प्रकरण सुरु होते तेव्हा एनसीबीने काही फोटो क्राईम रिपोर्टसना दिले आणि त्यानंतर ते टिव्हीवर दाखवण्यात आले. एनसीबीने बातम्या पेरल्या. हे फोटो दिल्लीच्या एनसीबीद्वारे जारी करण्यात आले आहेत. छापा टाकल्यानंतर पंचनामा केला जातो. जप्त केलेली वस्तू सील करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात यावी. तपासणीसाठी पाठवायचे असल्यास जिल्हा दंडाधिकाऱ्यांसमोर ते सील करुन पाठवण्यात यावेत असे नियम आहेत. हे व्हिडीओ झोनल कार्यालयाचे आहेत हे स्पष्ट होत आहे. हे प्रकरण प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलं आहे. एनसीबीने झोनल संचालकांसोबत गोसावीचे काय संबध आहेत याचा खुलासा करायला हवा. जर एनसीबी हे अधिकारी त्यांचे नाहीत असे म्हणत असतील तर ते कसे काय दोघांना घेऊन जात होते? एनसीबीला अधिकार आहेत का बाहेरच्या लोकांना घेऊन धाड टाकता येते जर असेल तर त्यांनी खुलासा करावा. गेल्या एका वर्षापासून भाजपा महाराष्ट्र सरकार, मुंबईच्या बॉलीवूडला बदनाम करण्यासाठी बनावट प्रकरणे तयार करत आहेत तसेच तीन तारखेचं प्रकरण संपूर्णपणे खोट आहे,” असे मलिक म्हणाले.