मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणात आता नवा वाद उफाळून आला आहे. भायखळा जेलच्या अधिकारी स्वाती साठे यांनी केलेल्या व्हॉट्स अॅप मेसेजसमुळे आता हा नवा वाद उफाळून आला आहे. प्रसारमाध्यमांमुळेच सहा पोलिस अधिकाऱ्यांना अटक झाली, आता तरी मीडियाचा आत्मा शांत झाला असेल अशा आशयाची पोस्ट स्वाती साठे यांनी व्हॉट्स अॅपवर टाकली आहे. जी व्हायरल होते आहे.

whatsapp-sathe

मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणामुळे पोलीस खात्यातले शीतयुद्ध नेमके असते तरी कसे हे समोर आले आहे. कारण ठाणे जेलचे निलंबित जेलर हिरालाल जाधव यांनीही याप्रकरणी स्वाती साठेंविरोधात तक्रार दाखल करून, त्या आरोपींच्या सुटकेसाठी पैसे गोळा करत असल्याचा आरोप केला आहे, इतकेच नाही तर आपण सगळे अधिकारी आणि कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ असे त्यांनी लिहील्याचा आरोपही जाधव यांनी केला आहे. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणाच्या तपासातून आपल्याला दूर ठेवले जावे अशी मागणी स्वाती साठे यांनी केल्याचीही माहिती समोर आली आहे.

swatisathe1

मात्र त्यांच्या व्हायरल पोस्टमुळे याप्रकरणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे, त्याचप्रमाणे या सगळ्या प्रकरणाचे खापर त्यांनी थेट मीडियावरच फोडले आहे. महाराष्ट्र कारागृह या व्हॉट्स अॅप ग्रुपवर स्वाती साठे यांनी टाकलेली व्हायरल पोस्ट आता व्हायरल होते आहे. मला आपल्या सहकाऱ्यांच्या तुरुंगात जाण्यामुळे अतीव दुःख झाल्याचेही स्वाती साठे यांनी पोस्ट केले आहे. या सगळ्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्याने आता नवा वाद निर्माण झाला आहे. मुंबईतल्या भायखळा जेलमध्ये २३ जून रोजी मंजुळा शेट्येला जबरदस्त मारहाण झाली होती, त्यानंतर २४ जूनला तिचा मृत्यू झाला होता. शीना बोरा हत्याकांडात मुख्य आरोपी असलेल्या इंद्राणी मुखर्जीने या प्रकरणी मंजुळावर सगळ्या महिला कैद्यांच्या समोर लैंगिक अत्याचार झाले असल्याची कबुली दिली होती ज्यामुळे खळबळ माजली होती. आता या प्रकरणातल्या व्हॉट्स अॅप पोस्टमुळे नवा वाद उफाळून आला आहे.

हिरामण जाधव यांचे नेमके आरोप काय?
ठाणे जेलचे निलंबित अधिकारी हिरामण जाधव यांनी याप्रकरणी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले आहे. स्वाती साठे या बेकादेशीररित्या आरोपींना वाचवण्यासाठी पैसे मागत असल्याचे असे त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून ५०० आणि १ हजार रूपये मागितले जात आहेत हे कोणत्या कायद्यात बसते असाही प्रश्न त्यांनी विचारला आहे. तुरूंगात जेवणाची कमतरता असल्यामुळे आणि तिथल्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे २३ जूनचा प्रकार घडला असल्याचेही जाधव यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी आता स्वाती साठे यांच्या अडचणींमध्ये भर पडण्याची शक्यता आहे.