मुंबई : सोमवारी सकाळी मानखुर्द येथे सायन-पनवेल महामार्गावर बेस्ट बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धडकल्याने एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या अपघातात बेस्टचे चालक-वाहक जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे समजते. बेस्ट बसच्या वाढत्या अपघातमुळे बेस्टच्या सुरक्षित प्रवासाबाबत प्रश्न उभे राहिले आहेत.
सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास मानखुर्द येथील सायन-पनवेल महामार्ग, विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्टची बस मार्ग क्रमांक ५०१ रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकावर आदळली. दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (६५) गंभीर जखमी झाले. त्यांना राजावाडी रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. जखमींमध्ये बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (५१) आणि वाहक वैभव वाघमारे (४१) यांचा समावेश आहे.
दोघांनाही राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजावाडी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हीरो यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, तीन व्यक्ती जखमी झाल्या होत्या. त्यापैकी एकाला ”मृत घोषित” करण्यात आले आणि दोघांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. बसमार्ग क्रमांक ५०१ बस कुर्ला ते ऐरोली दरम्यान धावते.
या अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोंडी झाली होती. मुंबईत बेस्ट बस अपघातांचे प्रमाण वाढले आहे. केवळ ५ महिन्यांत २४९ अपघात झाले असून त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश अपघात खाजगी कंत्राटदारांच्या ”भाडेतत्त्वावरील” बसमुळे होत आहेत. चालकांचा निष्काळजीपणा आणि अपुरी विश्रांती ही याची मुख्य कारणे आहेत.
