मुंबई: मानखुर्द येथील जनता नगर परिसरात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास तीन मजली संरचना असलेले घर कोसळले. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तसेच, एक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती महापालिकेने दिली. या दुर्घटनेतील मृतांची आता ओळख पटली असून असून मृतांमध्ये पाच बालक व एका महिलेचा समावेश आहे. तसेच त्यांची नावेही महापालिकेने रविवारी उशिरा रात्री उघड केली.

रविवारी सुरू असलेल्या मुसळधार पावसात शहरात अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. दिवसभरात झाड पडून दोन मृत्यू झाले. अशातच मानखुर्दमध्ये रविवारी रात्री घर कोसळल्याची दुर्घटना घडली. दुर्घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, संबंधित महापालिका विभाग कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. सातजण मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती स्थानिकांकडून प्राप्त झाल्यानंतर अग्निशामकांनी घटनास्थळी शोधमोहीम राबविली.

अथक प्रयत्नांनंतर ढिगाऱ्याखालून आलिया (७), मुस्कान (१४), निहाल (६), नाबिया (२), मुनाफ (७), सोनी (३२), रेहान अली (२४) या सात जणांना बाहेर काढण्यात आले. त्यातील पाच जणांना म्हणाजेच मुस्कान, आलिया, निहाल, नाबिया, सोनी यांना शताब्दी, तर उर्वरित दोघांना राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, शताब्दी रुग्णालयातील सर्वांचा, तर राजावाडी रुग्णालयातील मुनाफचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सद्यस्थितीत रेहान अली या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.