मुंबई : आईसोबत बाजारात गेलेल्या एका अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी मानखुर्द परिसरात घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी तपास करून काही तासातच या मुलाची सुटका केली. मुलाचे अपहरण करणाऱ्या पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली.

अपहरण करण्यात आलेला मुलगा मानखुर्दमधील शिवनेरी नगर परिसरात आई-वडिलांसोबत राहत होता. तो गुरुवारी सायंकाळी ६ च्या सुमारास आई आणि मामासोबत परिसरातील एका दुकानात कपडे खरेदीसाठी गेला होता. मामा आणि आई दुकानात कपडे खरेदी करण्यात व्यग्र असताना हा मुलगा दुकानाच्या बाहेर आला. त्यानंतर तो तिथून अचानक गायब झाला. त्याच्या आईने आणि मामाने बराच वेळ परिसरात मुलाचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. अखेर रात्री उशिरा त्यांनी या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.

पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी या प्रकरणाची

गंभीर दखल घेऊन तत्काळ मुलाच्या शोधासाठी आठ पथके तयार केली. या पथकांनी तत्काळ परिसरातील सीसीटीव्ही चित्रण ताब्यात घेऊन तपास केला. सीसीटीव्ही चित्रणात एक महिला सदर मुलाला घेऊन जात असताना निदर्शनास आले. ही बाब निदर्शनास येताच पथकांतील अधिकाऱ्यांनी तत्काळ या महिलेचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ही महिला मानखुर्द महाराष्ट्र नगर परिसरातील दुर्गा माता मंदिर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने महिलेच्या घरी छापा घातला. अपहरण केलेला मुलगा सदर महिलेच्या घरातच सापडला. पतीच्या मदतीने मुलाचे अपहरण केल्याची कबुली महिलेने दिल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र मुलाचे अपहरण का केले याबाबत महिलेने अद्याप पोलिसांना माहिती दिलेले नाही. नंतर पोलिसांनी मुलाला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. अपहरण करणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.