मुंबई : मानखुर्द येथील दुर्घटनेत पाच वर्षीय आलियाच्या हट्टाकडे दुर्लक्ष करणे हेच तिच्या आई वडिलांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दु:खाचे कारण ठरले आहे. आलियाच्या धाकट्या भावावर वाडिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पती-पत्नी दोघेही रुग्णालयात असल्याने त्यांनी त्यांच्या घरापासून जवळच राहत असलेल्या अलियाच्या मावशीकडे तिला ठेवले होते. अपघाताच्या दिवशी सकाळी आलिया आई आणि वडील अलाउद्दीन शेख यांना भेटण्यासाठी वाडिया रुग्णालयात गेली होती. ती अलियाची आणि तिच्या आई-वडिलांची शेवटची भेट ठरली.

“बाबा, मी इथेच तुमच्याबरोबर इथेच राहणार; मी घरी जाणार नाही, असा हट्ट करणाऱया अलिया शेख हिला तिच्या वडिलांनी समजूत काढून घरी पाठवले आणि इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत अलियाचा मृत्यू झाला. ” अलिया थांबण्याचा हट्ट करत होती. मात्र मुलावरील वैद्यकीय उपचार आणि रुग्णालयातील वातावरण यांचा विचार करून, अलियाला प्रेमाने समजावून तिच्या मावशीसोबत परत पाठवले, असे तिचे वडील अल्लाउद्दीन शेख यांनी सांगितले.

आपल्या मुलीशी होणारी ही शेवटचीच भेट असेल, याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती. तो क्षण आठवताच अलियाचे वडिल अलाउद्दीन यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. गदगदलेल्या आवाजात ते सांगतात, मी तिला माझ्याबरोबर राहू दिले असते, तिला परत पाठवले नसते, तर माझी मुलगी आज जिवंत असती. अपघाताच्या वेळी आलिया शेजारी राहणाऱ्या मोइनुद्दीन शाह यांच्या घरी खेळायला गेली होती. शेख यांच्या धाकट्या मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातच मुलगी कायमची गमावल्याच्या दुःखाने अलियाचे आई-वडील कोलमडून गेले आहेत.