मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे मानखुर्द मेट्रो स्थानकाजवळ बांधण्यात येणाऱ्या पादचारीपुलाआड बांधकामे येत असल्याचे दाखवून १९ झोपड्या आणि एक नर्सरी पात्र करण्यात आली होती. या झोपडीधारकांना काही दिवसांतच इमारतीमध्ये घरेही देण्यात येणार होती. मात्र ‘लोकसत्ता’ने बनावट झोपड्यांचा घोटाळा समोर आणल्यानंतर एमएमआरडीएने या सर्व झोपड्यांना सध्या स्थगिती दिली असून सर्व झोपडीधारकांची चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
अंधेरी – मानखुर्द मंडाळा मेट्रो २ बी मार्गात काही माफियांनी एमएमआरडीच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा केला होता. मानखुर्द मेट्रो स्थानकजवळ पादचारीपूल बांधण्यासाठी २८ झोपड्या बाधित होणार होत्या. मात्र या पादचारीपुलाची जागा बदलून हा पूल मोकळ्या जागेत बांधण्यात आला. त्यानंतर पुन्हा या ठिकाणी १७ जून २०२१ रोजी सर्वेक्षण करण्यात आले. यावेळी या झोपड्या असलेल्या जागेची गरज नसल्याने लक्षात आले. त्यामुळे या झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले नाही.
मात्र त्यानंतर काही माफियांनी एमएमआरडीएमधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी झोपड्या बाधित झाल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. तसेच अस्तिस्वात नसलेल्या झोपड्या जमीनदोस्त केल्याचे बनावट पुरावे तयार करून ते एमएमआरडीएला सादर केले. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची खातरजमा न करताच येथील १९ बनावट झोपड्या आणि एक नर्सरी पात्र केली. त्यानंतर या बनावट झोपडीधारकांना गोरेगाव येथे घर देण्याचे प्रयत्न सुरू झाले होते.
या बनावट झोपड्यांबाबत ‘लोकसत्ता’च्या २८ ऑगस्टच्या अंकात ‘मेट्रो प्रकल्पात बनावट बाधित झोपड्या दाखवून फसवणुकीचा प्रयत्न’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन एमएमआरडीएने या सर्व झोपड्यांना स्थगिती दिली. तसेच कागदपत्र आणि बनावट झोपड्यांची चौकशी करण्यासाठी एक समितीही स्थापन करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
