मुंबई :मानखुर्दमधील जनता नगरमध्ये रविवारी रात्री तीन मजली घर कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी आहे. मात्र या घराच्या तळ मजल्यावर राहणाऱ्या एका चार वर्षाच्या मुलाच्या प्रसंगावधनामुळे जवळपास २० ते २२ लोकांचे प्राण वाचले आहेत. सकाळपासून होत असलेल्या पावसामुळे घराच्या भिंतीला तडे गेल्याचे चार वर्षाच्या मुलाने आपल्या आईला दाखवले. त्यामुळे या तीन मजली घरासह शेजारील दोन घरातील नागरिकांनी घरे रिकामी केल्याने मोठी दुर्घटना टळली. अन्यथा मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता होती.
मानखुर्द दुघटनेमध्ये जखमी असलेला २४ वर्षीय रेहान अली यांच्यावर राजावाडी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. रेहान आपल्या काकाच्या कुटुंबासह या तीनमजली इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याने राहत होता. रेहानच्या काकांचा चार वर्षांचा मुलगा रविवारी सकाळी खेळत असताना त्याला घराच्या भिंतीला तडा गेल्याचा दिसला. त्याने घरात काहीतरी वेगळे घडतेय म्हणून ही गोष्ट त्याच्या आईला सांगितली. त्याची आई मेहर अली हिने घराच्या भिंतीला तडे गेल्याचे पाहून त्याबाबत घरातील सर्वांना सांगितले. त्यानंतर घराची पाहणी केली असता, घराच्या भिंतीला तडे जाण्याबरोबरच जमीन खचत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तातडीने घरमालकाला याची माहिती देऊन वरील मजल्यावरील रहिवाशांना आणि शेजाऱ्यांना सावध केले. त्यामुळे या तीन मजली इमारतीत राहणाऱ्या सर्वांनी घरे रिकामी करण्याबरोबरच त्याच्या शेजारी असलेल्या दोन घरातील कुटुंबांनी घरे रिकामी केली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वांनी घरे रिकामी केल्याची माहिती रेहान अलीने दिली.
दरम्यान रेहान अली सायंकाळी घरातील काही सामान आणण्यासाठी परत गेला होता. त्यावेळी अचानक इमारत कोसळली. यावेळी रेहान अली याने घरातून पळ काढला, मात्र त्यावेळी त्याच्या खांद्याला एक मोठे लाकूड लागल्याने तो जखमी झाला. चार वर्षाच्या मुलाने दाखवलेल्या धोक्याची सूचनेकडे त्या कुटुंबियांनी गांभीर्याने पाहिल्याने जवळपास २२ लोकांचे प्राण वाचण्यास मदत झाली.
