मुंबई: देशातील नामांकित आशा एअर इंडिया कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे अमिष दाखवून अनेकांची फसवणुक करणाऱ्या उत्तराखंडमधील एका बनावट कॉल सेंटरवर मानखुर्द पोलिसांनी छापा घातला. या प्रकरणी पोलिसांनी विविध राज्यांमधील एकूण ११ आरोपीना अटक केली. मानखुर्द परिसरात राहणाऱ्या तक्रारदार महिलेला काही महिन्यांपूर्वी अज्ञात व्यक्तीने फोन करून एअर इंडियामध्ये मोठ्या पगाराची नोकरीची संधी असल्याचे सांगितले. महिलेला नोकरीची गरज होती.
त्यामुळे तिने तत्काळ फोन करणाऱ्या व्यक्तीला होकार दिला. विविध शुल्काच्या नावाखाली आरोपीनी तिच्याकडून अडीच लाख रुपये उकळले. मात्र अनेक महिने उलटल्यानंतरही नोकरी मिळत नसल्याने महिलेने संबंधितांशी संपर्क साधला. मात्र त्यांचा फोन बंद होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. उत्तराखंडमधील डेहराडून येथील एका बनावट कॉल सेंटरमधून ही फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून या बनावट कॉल सेंटरवर छापा घातला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण ११ आरोपींना अटक केली असून सर्व आरोपी उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि हिमाचलमधील मुळचे रहिवासी आहेत. अटक आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी ९ लॅपटॉप, १३ मोबाइल आणि इतर साहित्य असा मोठा मुद्देमाल जप्त केला. या आरोपीनी अशाच प्रकारे संपूर्ण देशात अनेकांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
]
