scorecardresearch

मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान, छेडानगरमधील उड्डाणपुलाचे काम पूर्ण

हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर छेडानगर जंक्शन भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून  मानखुर्द – ठाणे प्रवास अधिक वेगाने होणार आहे. 

Mankhurd - Thane travel
मानखुर्द-ठाणे प्रवास लवकरच वेगवान,

मुंबई : छेडानगर येथील १ हजार २३५ मीटर लांबीच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या पुलाचे उदघाटन करण्याचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) मानस आहे. हा पूल वाहतुकीस खुला झाल्यानंतर छेडानगर जंक्शन भागातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार असून  मानखुर्द – ठाणे प्रवास अधिक वेगाने होणार आहे. 

 पूर्वमुक्त मार्गावरून विनाअडथळा येणाऱ्या वाहनांना छेडानगर जंक्शनमध्ये वाहतूक कोंडीत अडकावे लागते. त्यामुळे एमएमआरडीएने छेडा नगर वाहतूक सुधार प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पाअंतर्गत छेडा नगर येथे तीन उड्डाणपूल आणि एक सब-वे बांधण्यात येत आहेत. यापैकी पहिला तीन मार्गिकांचा पूल ६८० मीटर लांबीचा असून तो शीव आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. दुसरा दोन मार्गिकांचा १ हजार २३५ मीटर लांबीचा उड्डाणपूल मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या मार्गावर आहे. तर, तिसरा ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याला जोडण्यात आला आहे. यासाठी २४९.२९ कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत.

तीन उड्डाणपुलांपैकी ६३८ मीटर लांबीचा छेडा नगर उड्डाणपूल मार्च २०२२ मध्ये वाहतुकीस खुला झाला आहे. छेडा नगर उड्डाणपुलासह ५१८ मीटर लांबीच्या आणि ३७.५ मीटर रुंदीच्या सब-वेचा पहिला टप्पाही वाहतुकीसाठी खुला झाला आहे. आता छेडानगर जंक्शन परिसरातील १ हजार २३५ मीटर लांबीच्या मानखुर्द आणि ठाण्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. तसेच त्याचे उदघाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या दिवशी २२ मार्च रोजी करण्याच्या मानस आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. याविषयी महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांना विचारले असता त्यांनी पुलाचे काम पूर्ण झाले असून येत्या सात-आठ दिवसांत पूल वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगितले.

३० ते ४५ मिनिटांची बचत..

 पूर्वमुक्त मार्गावरून आलेली वाहने ठाण्याच्या दिशेने जात असताना छेडानगर जंक्शन परिसरातील वाहतूक कोंडीत अडकत होती. यामध्ये ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी वाया जातो. मात्र, छेडानगर येथील १ हजार २३५ मीटर लांबीचा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर हा वेळ वाचणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-03-2023 at 01:51 IST