अपुऱ्या पाणीपुरवठय़ाच्या संकटाचा सामना करणाऱ्या मानखुर्दवासियांसाठी महापालिकेने या परिसरात जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हे काम पावसाळ्यानंतरच सुरू होई शकेल. त्यामुळे पुरेशा पाणीपुरवठय़ासाठी मानखुर्दकरांना आणखी दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. मानखुर्दमधील बीएआरसी उड्डाणपुलापासून थेट रेल्वे स्थानकापर्यंत ९०० मि.मी. व्यासाची, तर मानखुर्द रेल्वे पूल व नाल्याखालून सूक्ष्म बोगदा पद्धतीने १२०० मि.मी. व्यासाची पोलादी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. सुमारे १० कोटी ९८ लाख रुपयांचे हे काम मेसर्स मिशीगन आरपीएस कंपनीला देण्यात येणार आहे. पावसाळ्याचे चार महिने वगळता २० महिन्यांमध्ये हे काम कंत्राटदाराला पूर्ण करावे लागणार आहे. या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदांची ग्राह्यता २७ जून २०१३ पर्यंत असल्यामुळे तातडीने हा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे आणला आहे. मात्र प्रत्यक्षात पावसाळ्यानंतरच या कामांना सुरुवात होईल. या जलवाहिन्या टाकल्यानंतर या परिसरात अधिक दाबाने पाणीपुरवठा होईल, असा विश्वास जल विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. याबाबतचा प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीच्या शुक्रवारच्या बैठकीत येणार आहे.
नालेसफाईचे आदेश
मुंबई : मुंबई उपनगरातील नालेसफाई ५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपनगर पालकमंत्री नसीम खान यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या बैठकीत महापालिका अधिकाऱ्यांना दिले. मिठी नदीची सफाई ११ टक्केच झाल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. ही सफाई वेगान पूर्ण करावी, पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीचे नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक वॉर्डात एक नियंत्रण कक्ष स्थापन करावा. महापालिका, रेल्वे, एमएमआरडीए, विमानतळ प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी आपल्या कामांचे नियोजन करावे, अशी सूचना त्यांनी केली.