राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार असून, सातव्या जागेसाठी चुरस होण्याची शक्यता आहे. शिवसेना नेते मनोहर जोशी इच्छुक असले तरी उद्योगपती संजय काकडे यांनी आधीपासूनच ‘जोर’ लावल्याची चर्चा आहे.
निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला असून, २१ ते २८ जानेवारी दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपण लोकसभेची निवडणूक लढणार नसून, राज्यसभेवर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. स्वत: पवार यांनी राज्यसभा लढणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
निवृत्त होणारे सदस्य  – मुरली देवरा व हुसेन दलवाई (काँग्रेस), वाय. पी. त्रिवेदी आणि जनार्दन वाघमारे (राष्ट्रवादी), भारतकुमार राऊत व राजकुमार धूत (शिवसेना), प्रकाश जावडेकर (भाजप).
कोणला संधी मिळणार ?
काँग्रेसमध्ये हुसेन दलवाई यांना दोन वर्षांची मुदत मिळाली असल्याने त्यांना आणखी एक संधी दिली जाईल. मुरली देवरा यांना प्रकृती साथ देत नाही. यामुळे त्यांच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता कमी आहे. अर्थात, देवरा यांचे दिल्लीतील संबंध लक्षात घेता आणखी एक संधी मिळूही शकते. राष्ट्रवादीत विद्यमान दोन्ही खासदारांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. शरद पवार यांच्याबरोबरच अल्पसंख्याक समाजातील एकाला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अ‍ॅड. माजिद मेनन यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपमध्ये प्रकाश जावडेकर यांनाच फेरसंधी दिली जाईल. संख्याबळानुसार शिवसेनेचा एकच उमेदवार निवडून येऊ शकतो.
सातव्या जागेसाठी चुरस
सातव्या जागेसाठी चुरस होणार आहे. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील बांधकाम ठेकेदार संजय काकडे यांना शरद पवार यांनी ऐनवेळी थांबण्याचा सल्ला दिला होता. यंदा मात्र त्यांनी आधीपासूनच तयारी केली आहे. १० ते १५ अपक्ष किंवा छोटय़ा पक्षांच्या आमदारांना काकडे यांनी गळाला लावल्याची चर्चा आहे. शिवसेना नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचाही सातव्या जागेवर डोळा आहे. भाजपची दहा तर शिवसेनेच्या नऊ अतिरिक्त मतांबरोबरच मनसेच्या १२ मतांची बेगमी झाल्यास जोशी यांचे गणित जुळू शकते. काकडे जोर मारतील अशी चर्चा आहे.

असा ठरतो मतांचा कोटा
एकूण मतदार २८७ (एक जागा रिक्त) भागीले आठ (एकूण जागा सात अधिक एक) = ३५.८७ म्हणजेच पहिल्या पसंतीची ३६ मते विजयासाठी आवश्यक आहेत. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने राजकीय पक्षांच्या आमदारांच्या मतांची फोडाफोड करता येत नाही. अपक्ष आणि छोटय़ा पक्षांचे ३० पेक्षा जास्त आमदार असल्याने सातव्या जागेसाठी इच्छुकांची मदार या मतांवरच आहे.