scorecardresearch

भारताचे २३ वर्षांनंतर पाणबुडीनिर्मिती क्षेत्रात पदार्पण

भारतात १९९३ नंतर पाणबुडीनिर्मिती थांबली आहे.

भारताचे २३ वर्षांनंतर पाणबुडीनिर्मिती क्षेत्रात पदार्पण
संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी माझगाव गोदीतील पाणबुडी बांधणी केंद्राचे शनिवारी लोकार्पण केले.

संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याकडून पाणबुडी बांधणी केंद्राचे लोकार्पण
पाणबुडी निर्मितीमध्ये भारताने २३ वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरुवात केली असून संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी माझगाव गोदीतील पाणबुडी बांधणी केंद्राचे शनिवारी लोकार्पण केले.
भारतात १९९३ नंतर पाणबुडीनिर्मिती थांबली आहे. क्षमता असूनही पाणबुडय़ांची निर्मिती थांबणे योग्य नाही, असे मत त्यांनी या वेळी नोंदवले. तसेच यापुढे पाणबुडीनिर्मिती संपूर्ण भारतीय बनावटीची होण्यावर सर्वाधिक भर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या वेळी माझगाव गोदीत झालेल्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेडचे अध्यक्ष माजी नौदलप्रमुख आर. के. शेरावत, पश्चिम नौदल विभागाचे व्हाइस अ‍ॅडमिरल सुनिल लांबा, मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
माझगाव येथील जहाजबांधणी केंद्रातील उत्पादन अंदाजे वार्षिक ४० टक्क्यांनी वाढले असून २०१३-१४ मध्ये हे उत्पादन २ हजार ८६५ कोटी होते. ते २०१५-१६ या आर्थिक वर्षांत तब्बल ४ हजार ९ कोटी इतके वाढले आहे, असे सांगत यापुढील काळात देशात नव्या तंत्रज्ञानासह संरक्षण निर्मिती क्षेत्रात मोठे प्रकल्प उभारले जाणार असल्याचेही त्यांनी सुतोवाच केले.
अत्याधुनिक सुविधा
‘माझगाव डॉक आधुनिक प्रकल्पा’अंतर्गत तयार करण्यात आलेले हे पाणबुडी बांधणी केंद्र अत्याधुनिक सुविधा व तंत्रज्ञानाने युक्त आहे. बऱ्याच काळानंतर भारतीय नौदलासाठी अशा पाणबुडीबांधणी केंद्राची निर्मिती या निमित्ताने झाली आहे. या केंद्रामुळे अल्पावधीतच भारतासाठी पाणबुडय़ांची निर्मिती पुढील काळात शक्य झाली असून भारतीय नौदल व किनारारक्षक दलाच्या गरजा आता भारतातच पूर्ण होणार आहेत. १५३ कोटी रुपये खर्चून तयार झालेले हे केंद्र असून या केंद्रात एकावेळी पाच पाणबुडय़ांची निर्मिती शक्य होणार आहे. तसेच ही बांधणी केंद्राची इमारत पर्यावरणपूरक उपक्रमही राबवणार असून पर्जन्य जल संवर्धन, मलनिसारण प्रक्रिया प्रकल्प, तेल आणि पाणी वेगळे करणारी यंत्रणा या इमारतीत बसवण्यात आली आहे. त्यामुळे, या इमारतीतून कोणत्याही प्रकारचा मैला व सांडपाणी हे महापालिकेच्या मलनिसारण वाहिनीत जाणार नाही अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या