मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या २९ ऑगस्ट रोजीच्या प्रस्तावित उपोषण आंदोलनासाठी रविवारी मराठा समाजाच्या नेत्यांनी सीएसटीएम समोरील आझाद मैदानाची पाहणी केली. मराठा समाजाला दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरत असल्याने जरांगे यांनी आंदोलनाचे हत्यार पुन्हा उपसले आहे.

मागच्या वर्षी २९ ऑगस्ट रोजी जरांगे यांचे मुंबईत आंदोलन झाले होते. सरकारने मराठा समाजाला दिलेली आश्वासने पूर्ण केली नसल्याने जरांगे यांनी आंदोलन हाक दिली. मागच्या आठवड्यात मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी मुंबई पोलीस आयुक्त आणि आझाद मैदान पोलीस स्टेशनला आंदोलनासाठी परवानगीचा अर्ज दिला. रविवारी आंदोलकांच्या नेत्यांनी आझाद मैदानाची पाहणी केली. आमचे आंदोलन शांततापूर्ण असेल, पोलिसांना आम्ही नोटीस दिली आहे, असे मराठा क्रांती मोर्चाचे प्रशांत सावंत यांनी सांगितले.

जरांगे यांना राज्यभरातून मोठे समर्थन आहे. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात आंदोलक येण्याची शक्यता असल्याने वाहतुकची समस्या उद् भवू शकते. मागच्या वर्षीच्या आंदोलनानंतर राज्य शासनाने ५७ लाख कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप केले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागास वर्गासाठीच्या राखीव मतदारसंघात विजयी ठरलेल्या मराठा -कुणबी व कुणबी -मराठा उमेदवारांची प्रमाणपत्रे पडताळणीत बाद ठरु लागल्याने जरांगे शासनाच्या विरोधात आक्रमक झाले आहेत.

तीन वर्षापूर्वी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी गावी जरांगे यांच्या उपोषणावर पोलीसांनी लाठीहल्ला केला होता. तेव्हापासून जरांगे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. जरांगे यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्यावर आहे. जरांगे यांच्या आंदोलनाचा फटका मंत्री चंद्रशेखर बाववकुळे यांना बसण्याची शक्यता आहे. कारण, बावनकुळे महसूल विभागाचे मंत्री असून त्यांच्या विभागाच्या चुकीमुळे कुणबी प्रमाणपत्रे पडताळणीत बाद ठरत आहेत, असा जरांगे यांचा आरोप आहे.