मुंबई: राज्यातील सर्व मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे यासाठी आतापर्यंत अनेक वेळा आमरण उपोषण करणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी उद्यापासून (३० मे) मराठवाड्यातल्या रणरणत्या उन्हात पुन्हा आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सरकार मधील नेत्यांची धाबे दणाणले आहेत. अगोदरच देशाची आर्थिक परिस्थिती कमकुवत झालेली असताना मराठा समाजाच्या या आंदोलनामुळे सरकार पुढे दुहेरी पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तो सोडवण्यासाठी महायुतीतील काही मराठा नेते जरांगे यांच्या भेटीसाठी आज अंतरवाली सराटी गावात जात आहेत
समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटीत उपोषणाचा दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी चर्चा करण्याकरिता सरकारच्या वतीने उद्या शिष्टमंडळ त्यांच्या गावात जाणार आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेना शिंदे पक्षात नव्याने प्रवेश केलेले आमदार बच्चू कडू आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड जरांगे पाटील यांची त्यांच्या गावात भेट घेऊन समजूत काढणार आहेत.
जरांगे यांच्या सात प्रमुख मागण्या आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन कायम स्वरुपी टिकणारे आरक्षण द्यावे, सगे सोयरे आदेशाची पूर्ण अंमलबजावणी, जुन्या नोंदी लागू करणे, मराठा आंदोलनकांवरील गुन्हे मागे घेणे, आंदोलनातील मृतांना जखमींना आर्थिक मदत, कुणबी प्रमाणपत्राची माहिती, आणि सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांचे शासन आदेश या मागण्यांचा समावेश आहे. त्यासाठी त्यांच्या मूळगावी अंतरावाली सराटीत अन्न, पाण्याचा त्याग करुन रणरणत्या उन्हात आमरण उपोषण करणार आहेत. महागाईचा भडका, पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, कांद्यांचा प्रश्न, शेतकरी कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांनी केंद्र व राज्य सरकार घेरले गेले असताना हा एक प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे महायुतीतील नेते जरांगे यांची समजूत काढण्यासाठी पाठविणार आहेत. सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांची यादी विखे पाटील जरांगे यांच्या समोर मांडणार आहेत.
