मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा २९ ऑगस्टपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत धडकण्याचाही इशारा त्यांनी दिला आहे. येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून त्यादरम्यान आंदोलक मुंबईत आल्यास गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही शहरात गर्दीचा ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे नियोजन करण्यासाठी व्यवस्थापन करावे, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे.

मराठा समाजाला दिलेली कुणबी जात प्रमाणपत्रे पडताळणीमध्ये बाद ठरत असल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा २९ ऑगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सरकार तीन वर्षांपासून केवळ आश्वासन देत आहे. २८ ऑगस्टपर्यंत सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. अन्यथा २९ ऑगस्टपासून आंतरवलीमध्ये आंदोलन केले जाईल, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच सरकारने डाव टाकला, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

गेल्यावर्षी २९ ऑगस्ट रोजी जरांगे यांचे मुंबईत आंदोलन झाले होते. त्यावेळी आंदोलनामुळे मुंबईतील व्यवस्था पूर्णतः कोलमडली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. यंदा गणेशोत्सवाला दहा-बार दिवस असले तरी बाजारपेठा गर्दीने फुलल्या आहेत. तसेच विविध सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे आगमन होत आहे. त्यामुळे आधीच मुंबईत गर्दी आहे. त्यात आंदोलक मुंबईत आल्यास प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात या आंदोलनाविषयी चिंता व्यक्त केली आहे. मुंबईत संभाव्य वाढत्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी उपाययोजना करावी, अशी विनंती समितीने केली आहे.

गणेशोत्सवानिमित्त बाहेरून मुंबईत येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. दरदिवशी सरासरी पाच लाख लोक मुंबई बाहेरून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी येत असतात. मुंबईतील सुप्रसिद्ध मंडळांच्या मूर्तींच्या दर्शनासाठी लाखो लोक रोज येतात. संध्याकाळी गर्दी जास्त असते. तसेच दीड दिवसाचे, पाच दिवसांचे घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपस्थळी गर्दी वाढत जाते. शेवटच्या दिवशी ही गर्दी नऊ ते दहा लाखांपर्यंत जाते.

मोर्चातील आंदोलक मुंबईत आल्यास मोठी वाहतूक कोंडी, लोकल गाड्यांना गर्दी, रस्त्यावर प्रचंड गर्दी होण्याची शक्यता आहे. मोठ्या गणेशोत्सव मंडळांकडे कार्यकर्ते व अन्य सुरक्षा व्यवस्था असते. मंडळांच्या परिसराची सुरक्षितता कार्यकर्ते पाहत असले तरी संंपूर्ण मुंबईतच यानिमित्ताने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकार, पोलिसांनी याविषयावर नियोजन करण्याची आवश्यकता आहे, अशी विनंती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲड. नरेश दहिबावकर यांनी पत्रात केली आहे.