मुंबई: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मुंबईत आंदोलनाच्या तयारीत असतानाच सरकारने दक्षिण मुंबईतील आंदोलनांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. यानुसार दक्षिण मुंबईत आंदोलनांसाठी आझाद मैदान हे एकमेव ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही आंदोलनाला एकाच दिवसासाठी परवानगी राहणार असून यासाठी आठवडाभरआधी परवनागी घ्यावी लागणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मागील वर्षी जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनामुळे मुंबईची व्यवस्था पूर्णत: कोलमडली होती. वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत राजपत्र लागू करण्यात आले असून जाहीर सभा, मोर्चे, आंदोलने, निदर्शने, धरणे यांना नियम लागू करण्यात आले आहेत. सामान्य नागरिकांना आणि वाहतुकीला कमीत कमी अडथळा निर्माण व्हावा आणि आंदोलकांना शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलन करता यावे, यासाठी हे नियम लाग करण्यात आले असून आझाद मैदानाव्यतिरिक्त दक्षिण मुंबई अन्य कुठेही आंदोलन, धरणे किंवा मोर्चे काढण्यास मनाई करण्यात आली आहे. आझाद मैदानातील आंदोलनासाठी चतु:सीमा निश्चित करण्यात आली असून पश्चिमेकडे बॉम्बे जिमखाना मैदान, पूर्वेकडे मुंबई महापालिका मुख्यालय, दक्षिणेकडे हजारीमल सोमाणी मार्ग आणि उत्तरेकडे मेट्रो रेल्वे प्रकल्प क्षेत्राची सीमा निश्चि करण्यात आली आहे.
सात दिवस आधी परवानगी, सुट्टीच्या दिवशी आंदोलन नाही
आंदोलनाच्या परवानगीसाठी किमान ७ दिवस आधी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे (पदनिर्देशित अधिकारी) किमान ७ दिवस अगोदर हमिपत्रासह अर्ज करावा लागणार आहे. परवानगी देताना आधी अर्ज करणाऱ्यास प्राधान्य दिले जाणार आहे. आंदोलन केवळ एका वेळी एका दिवसासाठी आणि फक्त शासकीय कामकाजाच्या दिवशीच करता येईल. शनिवार, रविवार किंवा शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नाही. विधिमंडळ अधिवेशन, व्हीव्हीआयपी/व्हीआयपी दौरे, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन किंवा सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे.
सायंकाळी ६ वाजेपर्यंतच परवानगी
एका दिवसाचे वेळेचे बंधन घालतानाच आंदोलनाची वेळ सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंतच निश्चित करण्यात आली आहे. संध्याकाळी ६:०० नंतर आझाद मैदान पूर्णपणे रिकामे करावे लागेल. त्यानंतर थांबणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. एका वेळी जास्तीत जास्त ५,००० (पाच हजार) आंदोलकांनाच उपस्थित राहण्याची मुभा असेल.
मोर्चावर बंदी
मागील वर्षी जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान मुंबईत झालेली वाहतूककोंडी समस्या पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात आली आहे. आझाद मैदानाकडे येणारा किंवा तिथून बाहेर जाणारा कोणताही मोर्चा काढता येणार नाही. आंदोलकांनी थेट मैदानावरच शांततेत जमायचे व तिथूनच बाहेर जावे लागणार आहे. आंदोलनात ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाडी, सायकल-रिक्षा, हातगाड्या, जड वाहने तसेच घोडे, हत्ती, उंट यांसारखे प्राणी/पक्षी आणण्यास सक्त मनाई कण्यात आली आहे.
अन्य निर्बंधही लागू
त्याचप्रमाणे परवानगीशिवाय लाऊडस्पीकरही वापरता येणार नाही. पोलिसांच्या विशेष परवानगीशिवाय लाऊडस्पीकर वापरता येणार नाही. परवानगी मिळाल्यास ध्वनी प्रदूषण नियमांनुसार विहित डेसिबल मर्यादेतच वापर करावा लागेल. त्याचप्रमाणे आंदोलनासाठी वपारण्याच्या झेंड्याचा आकारही निश्चित करण्यात आला आहे. झेंडा किंवा बॅनरचा आकार ९ फूट × ६ फूट पेक्षा मोठा नसावा आणि त्यासाठी वापरलेली काठी २ फुटांपेक्षा जास्त लांबीची नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मैदानावर पक्के किंवा तात्पुरते तंबू, मंडप उभारण्यास सक्त मनाई करण्यात आली असून लाठ्या, तलवारी, बंदुका, भाले किंवा इतर कोणतीही घातक शस्त्रे जवळ बाळगणे, भडकाऊ भाषण करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
आंदोलकांवर कारावाईचा इशारा
आक्षेपार्ह व्हिडिओ/ऑडिओ तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करणे, आत्मदहन, आत्महत्येचा प्रयत्न किंवा आमरण उपोषण करणे, पुतळे, कागदपत्रे किंवा पुस्तके जाळणे, आंदोलनस्थळी अन्न शिजवणे किंवा कचरा टाकणे, रस्ते किंवा पदपथ अडवण्यास मनाई करण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान सार्वजनिक किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान झाल्यास किंवा जाळपोळ झाल्यास त्याची संपूर्ण भरपाई आयोजकांकडून व सहभागी व्यक्तींकडून वसूल केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ आणि ‘महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१’ अन्वये आयोजकांवर व कार्यकर्त्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
