मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी पुन्हा मुंबईकडे कूच करण्याची घोषणा केली. त्यामुळे राज्याच्या गृह विभागासमोर कायदा,सुव्यवस्थेबरोबरच वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहणार आहे. जरांगे पाटील १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. १९ सप्टेंबरला आझाद मैदानात आंदोलन करण्याचे त्यांचे नियोजन आहे. याच काळात गणेशोत्सवाची गर्दी आणि विसर्जनाची तयारी सुरू असल्याने मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई पोलिसांवर अतिरिक्त बंदोबस्ताचा ताण येणार आहे.
गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताचे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. त्यात आता जरांगे यांच्या आंदोलनाचे आव्हान पोलिसांच्या समोर ठाकले आहे. शहरात १७ हजार हून अधिक पोलिस कर्मचारी आणि एसआरपीएफच्या १२ कंपन्या तैनात करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले. दंगल नियंत्रण पथके, त्वरित प्रतिसाद पथके, बॉम्बशोधक पथके आणि इतर सुरक्षा यंत्रणांचाही वापर करण्यात येणार आहे. यंदा जरांगे यांच्या मोर्चासोबत गणेशोत्सवाची गर्दी व्यवस्थापित करणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान आहे. गेल्या वर्षी गणेशोत्सवाच्या काळातच जरांगे यांच्या आंदोलनामुळे पोलिसांवर ताण पडला होता. विशेषत: दक्षिण मुंबईतील सारी व्यवस्था कोलमडून पडली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर जरांगे समर्थकांची होणारी गर्दी, गणेशोत्सवाची गर्दी आणि मुंबईची नियमित वाहतूक अशा तिन्ही आघाड्यांचा समन्वय साधण्याचे आव्हान असणार आहे. नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांचे नियमन, पनवेल-कळंबोली-वाशी मार्गावरील वाहतूक, आंदोलकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था आणि पुढे आझाद मैदान परिसरातील गर्दी नियंत्रण या सर्व बाबींचे स्वतंत्र नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली गेली आहे. जरांगे यांचे आंदोलन मुंबईत धडकणार नाही यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत.
गतवेळी आंदोलकांच्या वाहनांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि सायन-पनवेल महामार्गावर वाहतुकीवर परिणाम झाला होता. नवी मुंबई हा मुंबईच्या आंदोलनाचा पहिला महत्त्वाचा सुरक्षा आणि वाहतूक तपासणीबिंदू ठरणार आहे. मागील अनुभव लक्षात घेऊन प्रवेशमार्ग, वाहनांची संख्या आणि गर्दीचा अंदाज यावर पोलिसांना आधीच नियोजन करणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने शांततामय आंदोलनाचा अधिकार मान्य केला असला तरी कायदा-सुव्यवस्था आणि शहरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाला नियम व अटी घालण्याचा अधिकार आहेत, असे स्पष्ट केले आहे. पोलिसांसमोर आंदोलनाचा घटनात्मक अधिकार आणि मुंबईची वाहतूक व कायदा-सुव्यवस्था यांच्यात समतोल साधण्याची कसोटी आहे.
गणेशोत्सवाच्या काळात जरांगे यांनाी मुंबईत येऊ नये
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईक पोलीस यंत्रणांवर ताण असतो. अशा वेळी उपोषणामुळे पोलिसांवर अतिरिक्त ताण पडेल. तसेच गणेशभक्त व सामान्य नागरिकांचे हाल होतील. यामुळेच गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत येऊ नये, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जरांगे यांना केले आहे.
