मुंबई: मराठा समाजाचा आवाज म्हणून मनोज जरांगे यांच्या कडे मराठा समाज बघत आहे. जरांगे यांच्या इशाऱ्यावर लाखाचे मोर्चे निघाले. जरांगे यांच्या मुंबई मोर्चाने तर मुंबई ठप्प झाली होती. त्याची दखल मुंबई उच्च न्यायालयाला देघ्यावी लागली होती. त्याच जरांगे यांना मराठा समाजाकडून विरोध होऊ लागला आहे. काय आहेत कारणे.  समाज माध्यमावर या विरोधाचा चांगलाच जोर आहे.

वाचा देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस महाग झाले. कांदा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली. कापसाला कमी भाव मिळाला. साखरेची निर्यात थांबली. ऊस उत्पादक अडचणीत आला आहे. खत, औषधे, बियाणांची टंचाई भासू लागली आहे. प्रचंड तापमान वाढले आहे. पंतप्रधानांनी काटकसरीचा सल्ला दिला. वाहने कमी वापरा असे म्हटले आहे.अशा प्रतिकूल परस्थितीत केवळ ‘एका जातीच्या प्रमाणपत्रासाठी’ आंदोलन करणे योग्य ठरत नाही, अशा शब्दात मराठा समाजातील तरुणांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला विरोध केला आहे.

मराठा समाज आंदोलक मनोज जरांगे यांनी ३० मे पासून जालना जिल्ह्यातील (तालुका अंबड) अंतरवाली सराटी या त्यांच्या मूळ गावातून पुन्हा उपोषण आंदोलनाचा इशारा दिला आहे. जरांगे यांच्या या आंदोलनावरुन आतापर्यंत त्यांना साथ देणाऱ्या मराठा समाजात दोन गट पडले आहेत. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या या मागणीसाठी सुरु झालेले हे आंदोलन गेली चार वर्षे सुरु आहे. आरक्षणासाठी आंदोलन आवश्यक आहे, असे मानणारा एक गट आहे. सरकार बरोबर नेहमीच संर्घष करण्याऐवजी संवादाची भूमिका घेण्याची आवश्यकता आहे असे मानणारा दुसरा एक गट आहे. देशातील सद्यस्थिती पाहता आंदोलनाची ही वेळ नाही, असे म्हणणारा एक वर्ग आहे. मराठा समाजात आता एकमत राहिलेले नाही. आंदोलनामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. मुंबईतील आंदोलनाने समाजाच्या फारसे काही पदरात पडले नाही, असे मतही व्यक्त केली जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्यानंतर आंदोलनाचे हे हत्यार वापरले जाते का, समाजाच्या नेत्यांचे उपद्रव मूल्य एकदाच सिध्द होते. बाकी नंतर केवळ ठणठणाट होतो अशी बोचरी टीका समाजमाध्यमावर केली जात आहे.

मराठा समाजाच्या मागण्याविषयी सरकारने सहानभुतीने विचार करावा. कुणबी प्रमाणपत्रासाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीने सद्यस्थिती समाजापुढे ठेवायला हवी. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तोपर्यंत सरकारने समाधानकारक उत्तरे दिली तर हे आंदोलन करण्याचा प्रश्न येणार नाही. आंदोलन करण्याची वेळ आली तर जरांगे पाटील यांनी मराठवाड्यातील उष्णता, देशातील सद्यस्थिती याचा विचार करुन आंदोलन केले पाहिजे.- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ