मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आणि सरकारने यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने कूच करण्याचे जाहीर केले आहे. १५ सप्टेंबर रोजी मनोज जरांगे अंतरवली सराटीतून मुंबईकडे निघणार असून १९ सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसणार आहेत. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यांच्या या उपोषणाला परवानगी नाकारली आहे.
मनोज जरांगे काय म्हणाले?
जाहीर सभा, आंदोलने व मिरवणुका नियम २०२५ चा नियम भंग करणार असल्याची खात्री आहे, असं म्हणत मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटलांना आंदोलनासाठी परवानगी नाकारली. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखू शकत नाही असा निर्णय उच्च न्यायालयानं दिला होता. त्यामुळे सरकार न्यायदेवतेचा अपमान करत आहे, असं मनोज जरांगे म्हणाले. दरम्यान मुंबई पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारण्याची कारणं दिली आहेत.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या पत्रकात नेमकी काय कारणं दिली आहेत?
१) नियम २०२५ मधील नियम ११ (ड) नुसार आंदोलनादरम्यान आमरण उपोषण किंवा आत्मदहनाचा प्रयत्न करण्यास सक्त मनाई आहे.
२) एका आंदोलनास एका वेळी फक्त एकच दिवसासाठी (सकाळी ९ ते संध्याकाळी ६) परवानगी दिली जाते. शनिवार, रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी परवानगी नसते. जरांगेंनी शनिवार (१९ सप्टेंबर) पासून पुढे मागण्या मान्य होईपर्यंत अनिश्चित कालावधीसाठी उपोषणाची मागणी केली आहे, हे नियमांचे उल्लंघन आहे.
३) पोलिसांनी वाहतूक कोंडीचंही कारण दिलं आहे. आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मनोज जरांगेंनी “गाड्या लाखात आहेत” असे वक्तव्य अंतरवाली सराटीमध्ये केलं होतं. गेल्या वर्षी सुमारे ५ हजार वाहनं दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर अनधिकृतपणे उभी करून रस्ता रोको केला गेला. यंदाही तशीच शक्यता असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याचा धोका आहे.
४) सार्वजनिक ठिकाणी अडथळा: मोर्चे, रस्ता रोको, रेल्वे स्थानके, महापालिका मुख्यालय व महत्त्वाच्या चौकांमध्ये रस्त्यावर बसणे किंवा झोपणे यावर मनाई आहे. मागील आंदोलनाचा अनुभव असा होता की गेल्या वर्षी बेस्ट बसमध्ये घुसखोरी, वाहनांवर चढून विक्षेप कृत्य करणे, नारेबाजी करणे यामुळे १३ दखलपात्र गुन्हे दाखल झाले होते. लाखो आंदोलक आल्यास त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहणार नाही.
५) नियम ६ नुसार आंदोलकांची कमाल संख्या पाच हजार असावी लागते. आझाद मैदानात ७ हजार चौरस मीटर जागा राखीव असून तेथे फक्त ५ हजार आंदोलक समावू शकतात. लाखोंच्या संख्येचे आवाहन मनोज जरांगेंनी केलं होतं. गेल्या वर्षी५ हजार आंदोलकांची मर्यादा असताना सुमारे ४० हजार आंदोलक आले होते. ज्यामुळे इतर आंदोलकांच्या आंदोलनाच्या हक्कावर गदा आली होती.
६) सार्वजनिक आरोग्याच्या नियम ११ (ज) नुसार विनिर्देशित क्षेत्रात अन्न शिजवणे व कचरा टाकणे मना आहे. गेल्या वर्षी रस्त्यावर व वाहनांमध्ये अन्न शिजवून कचरा टाकल्याने तसेच फूटपाथवर अंघोळ केल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. या सगळ्याचा रुग्णालयांवर परिणाम झाला होता. आझाद मैदान परिसरात जी.टी., कामा, सेंट जॉर्ज आणि बॉम्बे हॉस्पिटल ही मोठी रुग्णालये आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे रुग्णसेवेवर आणि रुग्णवाहिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो हे कारणही पोलिसांनी दिलं आहे.
७) गणेशोत्सवाचं कारणही मुंबई पोलिसांनी दिलं आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की १४ सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होत आहे. या काळात भाविकांची मोठी गर्दी असते आणि सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई कायम संवेदनशील असते. आंदोलनाची अलोट गर्दी झाल्यास पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांमध्ये मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.
