मुंबई : मुंबईत सोमवारी सकाळपासून जोरदार पाऊस सुरु असून मनोरी समुद्रकिनाऱ्याजवळ दुपारच्या वेळेस एक जहाज भरकटले असून गोराई पोलिसांकडून याबाबत तटरक्षक दलाला माहिती देण्यात आली. सध्या तटरक्षक दल आणि पोलिसांकडून जहाजावर लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, सध्या समुद्रात ताशी ८० ते ९० किमी प्रतितास या वेगाने वारे वाहत असल्याने तसेच समुद्रकिनारा खडकाळ असल्याने मदतकार्यात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सोमवारी दुपारी मनोरी येथील समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर एक भरकटलेले जहाज दिसून आले. गोराई पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच तात्काळ समुद्रकिनारी धाव घेतली. जहाज समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असून मुसळधार पाऊस आणि वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने जहाज हेलकावे खाताना दिसत आहे. दरम्यान, गोराई पोलिसांनी या घटनेची माहिती तटरक्षक दलाला दिली असून तटरक्षक दलाची टीम मनोरी समुद्रकिनारी दाखल झाली आहे. समुद्रकिनारा खडकाळ असून तसेच वाऱ्याचा वेग अधिक असल्याने लहान बोटींच्या साहाय्याने जहाजाजवळ जाणे धोकादायक ठरू शकते असे स्थानिक मच्छीमारांचे म्हणणे आहे.

सध्या तटरक्षक दल आणि पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून जहाजावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेराची मदत घेण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत सध्या ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहत असून त्यामुळे समुद्रही खवळलेल्या स्थितीत आहे. पावसाचा जोर अधिक असल्याने समुद्रातील दृश्यमानता कमी झाली आहे. वाऱ्याच्या वेगाने आणि वादळी पावसामुळे हे जहाज भरकटून मनोरी किनाऱ्याजवळ आले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पावसाची तीव्रता लक्षात घेता मुंबईला तसेच ठाणे जिल्ह्याला सोमवारी दिवसभर अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.

दरम्यान, शनिवारी मुंबईच्या किनारपट्टीपासून दूर असलेल्या ‘एमटी देश शक्ती’ या कच्च्या तेलाची वाहतूक करणाऱ्या जहाजावरील जखमी खलाशाला वाचविण्यात भारतीय नौदलाला यश आले होते. यासाठी ‘आयएनएस शिक्रा’ येथून भारतीय नौदलाचे ‘सी किंग’ हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले होते.

पुढील काही तास पालघर, मुंबई, ठाणे आणि रायगड येथे पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. जोरदार वाऱ्यांमुळे महामुंबईतील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडत आहेत. तसेच आज दुपारी समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यता असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.