मुंबई : महापालिकेने मुंबईतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी हाती घेतलेल्या मनोरी येथील प्रस्तावित निःक्षारीकरण प्रकल्पाला मच्छीमारांकडून तीव्र विरोध होत आहे. येत्या १९ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या प्रकल्पाला विरोध करणारे ठाकरेंचे समर्थक असून केवळ भाजपला श्रेय मिळू नये यासाठी हा विरोध केला जात आहे, असा आरोप महानगरपालिकेतील सभागृहनेते गणेश खणकर यांनी केला. तसेच या प्रकल्पामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडणार नसल्याचा दावा करत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतून दरदिवशी ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, प्रत्यक्षात मुंबईची पाणीपुरवठ्याची दैनंदिन गरज ४६०० दशलक्ष लिटर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकरीता महापालिकेने मनोरी निःक्षारीकरण प्रकल्प हाती घेतला आहे. समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करणे हा मनोरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पांतर्गत दररोज समुद्रातील ५०० दशलक्ष लिटर पाणी उपसून त्यातून २०० दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार केले जाईल, तर सुमारे ३०० दशलक्ष लिटर अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाईल. या विसर्गामुळे सागरी पर्यावरण आणि मत्स्यसंपत्तीवर गंभीर परिणाम होण्याची भीती मच्छीमार समुदायाकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणारे ठाकरेंचे समर्थक असल्याचा आरोप खणकर यांनी केला.

भाजपला श्रेय मिळू नये यासाठी आटापिटा सुरू असल्याचा आरोप मनोरी प्रकल्प ठाकरेंच्या काळात कागदावर आला, त्यावेळी त्याला का विरोध केला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भाजपला श्रेय मिळू नये, यासाठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याची टीका खणकर यांनी विरोध करणाऱ्यांवर केली. दरम्यान, आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला, तिथे कुठेही मच्छीमारांनी विरोध केलेला नाही. तसेच प्रकल्पामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही, असाही दावा खणकर यांनी केला.

मुद्द्याला राजकीय वलय देण्याचे काम खणकर यांनी करू नये

खणकर यांनी प्रकल्पाचा डीपीआर वाचवा. सुरुवातीची ६० पाने वाचल्यानंतर या प्रकल्पातील त्रुटी समोर येतील. तसेच, या मुद्द्याला राजकीय वलय देण्याचे काम खणकर यांनी करू नये, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल म्हणाले. ठाकरेंच्या काळात प्रकल्पाचा डीपीआर तयार झाला नव्हता. त्यामुळे तेव्हा विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता, असेही ते म्हणाले. तसेच यापूर्वी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आम्ही आवाज उठवला आहे. आदित्य ठाकरेंच्या बालहट्टामुळे हा प्रकल्प आणला जात असून भाजप हा प्रकल्प पूर्णत्वास नेत असल्याची टीकाही तांडेल यांनी केली.

आमच्या संघटनेचा किंवा माझा कोणत्याही राजकीय पक्षासोबत संबंध नाही. निवडणुकीच्या काळात स्थानिक नगरसेवकांच्या प्रचारात सहभागी होणे म्हणजे त्यांच्या पक्षाशी जोडले जाणे नव्हे. हा विरोध कोणत्याही राजकीय हेतूने केला जात नाही. वर्षानुवर्ष सुरू असलेला पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय मनोरी प्रकल्पामुळे उध्वस्त होत असल्याने त्याला विरोध केला जात आहे. प्रकल्पामुळे पर्यावरणाचे नुकसान होणार नसेल, तर प्रशासकांनी मच्छिमारांसोबत थेट चर्चा करावी. – किरण कोळी, सरचिटणीस (महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती)