मुंबई : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या मनोरी येथील प्रस्तावित निःक्षारीकरण प्रकल्पाला सुरुवातीपासूनच मच्छीमारांचा विरोध आहे. या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांचे व्यवसाय धोक्यात येणार असल्याची भीती मच्छीमारांमध्ये निर्माण झाली असून केवळ मुंबईकरांनी कराच्या रूपात महापालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या पैशांची उधळपट्टी प्रशासनाकडून केली जात असल्याचा आरोप कोळी समाजाकडून करण्यात येत आहे. हा विनाशकारी प्रकल्प तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्व मच्छीमार संघटनांनी १९ ऑक्टोबर रोजी वांद्रे येतील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
समुद्राच्या खाऱ्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचे पिण्यायोग्य पाण्यात रूपांतर करणे, हा मनोरी प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत नागरिकांच्या मनात विविध प्रश्न, शंका आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. निःक्षारीकरण प्रक्रियेमुळे समुद्रातील जैवविविधता, माशांची प्रजनन व संगोपन क्षेत्रे, मासेमारीची पारंपरिक ठिकाणे, तसेच मच्छीमारांच्या उपजीविकेवर होणाऱ्या संभाव्य परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मच्छीमार संघटनांमध्ये बैठक झाली होती. त्या बैठकीत प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार १९ ऑक्टोबर रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आणलेला हा प्रकल्प आता महायुती सरकार पूर्णत्वास नेत असल्याने मच्छीमार समाजात तीव्र संताप आहे. उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सत्ताधारी बदलले, मात्र जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि मच्छीमारांच्या अस्तित्वाशी खेळण्याचे धोरण कायम राहिले, अशी टीका अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने केली आहे.
… तर सागरी मत्स्यसंपत्तीवर गंभीर परिणाम
दररोज समुद्रातील ५०० दशलक्ष लिटर पाणी उपसून त्यातून २०० दशलक्ष लिटर पिण्यायोग्य पाणी तयार केले जाईल, तर सुमारे ३०० दशलक्ष लिटर अतिक्षारयुक्त पाणी पुन्हा समुद्रात सोडले जाईल. या विसर्गामुळे सागरी पर्यावरण आणि मत्स्यसंपत्तीवर गंभीर परिणाम होण्याची भीती समितीचे कार्याध्यक्ष बर्नार्ड डिमेलो यांनी व्यक्त केली.
समुद्रावर प्रक्रिया करण्याचा अट्टहास कशासाठी?
समुद्राचे पाणी महागड्या प्रक्रियेतून गोड करण्याआधी मुंबईतील पाण्याची गळती रोखण्याची इच्छाशक्ती सरकारने दाखवावी. मुंबईच्या पाणीपुरवठा प्रक्रियेत सुमारे ३४ टक्के पाणी वाया जाते. त्यामुळे हिशोबबाह्य पाण्याचे प्रमाण कमी करण्यावर प्रशासनाने भर द्यावा. कोट्यवधी रुपये खर्चून समुद्रावर प्रक्रिया करण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न उपस्थित करत समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल यांनी सर्वसामान्य मुंबईकरांवर या प्रकल्पामुळे आर्थिक भार पडण्याची भीती व्यक्त केली. या प्रकल्पाविरोधातील जनक्षोभ तीव्र करण्यासाठी १९ ऑक्टोबर रोजी मनोरी–गोराई परिसर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा प्रकल्प रद्द होईपर्यंत संघर्ष सुरू राहणार असल्याचे समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी सांगितले.
