मुंबई : समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळविण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला राज्य सरकारची मंजूरी मिळाली आहे. त्यानंतर आता मालाड मनोरी येथील प्रकल्पाला वेग मिळणार आहे. वर्ष २०२९ मध्ये हे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही पालिका अधिकाऱ्यांनी स्थायी समितीत दिली.
समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवल्यानंतर ते पाणी कांदिवली येथे अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेत मिसळण्यासाठी मनोरी ते कांदिवली दरम्यान जलबोगदा बांधण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीत मंजुरी देण्यात आली. त्याचवेळी समुद्राच्या पाण्यापासून मिळालेले पाणी आरोग्यासाठी चांगले आहे का? असे प्रश्न यावेळी सदस्यांनी उपस्थित केले.
मुंबईची पिण्याच्या पाण्याची मागणी सध्या ४,६०० दशलक्ष लिटर प्रतिदिन आहे. उपलब्ध पाणीपुरवठा ४,१०० दशलक्ष लिटर आहे. पिण्याच्या पाण्याची सातत्याने वाढणारी मागणी तसेच, भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महापालिकेने मालाडच्या मनोरी येथे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे.
प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणी या प्रकल्पातून मिळणार आहे.भविष्यात दर दिवशी ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यापर्यत या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मिळणारे पाणी मनोरी येथे जल उदंचन केंद्रातून जलबोगद्यांद्वारे मनोरी ते चारकोप व पुढे महावीर नगरपर्यंत वाहून आणले जाईल. त्यासाठी जलबोगदे बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता.
गेल्यावेळी या प्रस्तावावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत प्रशासनाने याबाबत स्थायी समितीसमोर सादरीकरण केले. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.दरम्यान, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. मनोरी येथे निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्पातच या कामाचा समावेश का केला नाही. या कामाचा स्वतंत्र प्रस्ताव आणून अधिकचा खर्च का केला? असा सवाल त्यांनी केला.
जलबोगद्यांचा खर्च १,५७५ कोटी आहे. तर मूळ प्रकल्पाचा खर्च ४,०७७ आहे. सर्व करांसह हा खर्च ११,१६६ कोटींवर गेला होता. त्यात आता हा जलबोगद्यांचा खर्च १५७५ कोटी अधिकचा झाल्याबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, जलबोगद्यांचे काम हे वेगळ्या स्वरूपाचे, स्वतंत्र असल्यामुळे त्याचे स्वतंत्र प्रस्ताव आणल्याचे बांगर यांनी यावेळी सांगितले.
‘धरणातील पाण्याइतकेच शुद्ध’समुद्राच्या पाण्यापासून मिळालेल्या पाण्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत का? असा सवाल काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला होता. दुबईमध्ये या पद्धतीने पाणी मिळवले जाते व तिथे नागरिकांना विविध आजार असून केस गळतीच्याही समस्या आहे. यावर उत्तर देताना, या प्रकल्पातील पाणी हे धरणातून येणाऱ्या व शुद्धीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याइतकेच चांगले असेल, अशी ग्वाही अभिजीत बांगर यांनी दिली.
प्रकल्पाविषयी…जलबोगदे एकूण लांबी: ७.१७५ किमी.
मनोरी ते चारकोप: ४.६३ किमी.चारकोप ते कांदिवली: २.५४५ किमी.
व्यास: खोदकामाचा व्यास ३.२ मीटर असून आतील व्यास २.५ मीटर असेल.
