मुंबई : समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे गोडे पाणी मिळवण्याच्या मुंबई महापालिकेच्या प्रकल्पाला राज्य सरकारची मंजुरी मिळाली आहे. त्यानंतर आता मालाड मनोरी येथील प्रकल्पाला वेग येणार असून हे काम २०२९ मध्ये पूर्ण होईल, अशी ग्वाही महापालिका अधिकाऱ्यांनी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. मात्र हे पाणी मानवी शरीरासाठी चांगले आहे का, यामुळे केस गळती होईल का, दुबईमध्ये अशाच पाण्यामुळे अनेक लोकांना टक्कल पडले आहे, असे मुद्दे स्थायी समितीमध्ये सदस्यांनी उपस्थित केले.

समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी तयार केल्यानंतर ते पाणी कांदिवली येथे अस्तित्वात असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेमध्ये मिसळण्यासाठी मनोरी – कांदिवलीदरम्यान जलबोगदा बांधण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला स्थायी समितीमध्ये मंजुरी देण्यात आली. समुद्राच्या पाण्यापासून मिळालेले गोडे पाणी आरोग्यासाठी चांगले आहे का ? असे प्रश्न यावेळी सदस्यांनी उपस्थित केले.

मुंबईची पिण्याच्या पाण्याची मागणी सध्या प्रतिदिन ४६०० दशलक्ष लिटर इतकी असून सध्या ४१०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पिण्याच्या पाण्याची सातत्याने वाढणारी मागणी, तसेच भविष्यातील पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करण्यासाठी महापालिकेने मालाडच्या मनोरी येथे समुद्राच्या पाण्यापासून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याचे ठरवले आहे. प्रतिदिन २०० दशलक्ष लिटर पाणी या प्रकल्पातून मिळणार असून भविष्यात दर दिवशी ४०० दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यापर्यंत या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यात येणार आहे.

या प्रकल्पातून मिळणारे पाणी मनोरी येथे जल उदंचन केंद्रातून जलबोगद्यांद्वारे मनोरी – चारकोप व पुढे महावीर नगरपर्यंत वाहून आणले जाणार आहे. त्याकरीता जलबोगदे बांधण्याच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला होता. गेल्या वेळी या प्रस्तावावर विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत प्रशासनाने याबाबत स्थायी समितीसमोर सादरीकरण केले. अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी या प्रकल्पाची माहिती दिली.

दरम्यान, काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी या प्रस्तावाला विरोध दर्शवला होता. मनोरी येथे निक्षारीकरण प्रकल्प उभारण्याच्या प्रकल्पातच या कामाचा समावेश का केला नाही. या कामाचा स्वतंत्र प्रस्ताव आणून अधिकचा खर्च का केला ? असा सवाल त्यांनी केला. जलबोगद्यांचा खर्च १५७५ कोटी आहे. तर मूळ प्रकल्पाचा खर्च ४०७७ आहे. सर्व करांसह हा खर्च ११,१६६ कोटींवर गेला होता. त्यात आता या जलबोगद्यांसाठी अधिकच्या १५७५ कोटी खर्चाबद्दल त्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, जलबोगद्यांचे काम हे वेगळ्या स्वरुपाचे, स्वतंत्र असल्यामुळे त्याचे स्वतंत्र प्रस्ताव आणल्याचे बांगर यांनी यावेळी सांगितले.

आरोग्यावर परिणाम होणार का ?

समुद्राच्या पाण्यापासून मिळालेल्या पाण्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाहीत का ? असा सवाल काँग्रेसच्या ट्युलिप मिरांडा यांनी उपस्थित केला होता. दुबईमध्ये या पद्धतीने पाणी मिळवले जाते व तिथे नागरिकांना त्वचेचे विविध आजार असून केस गळतीचीही समस्या भेडसावत आहे. या पाण्यामुळे आंघोळ केल्यावर केस गळतात व टक्कल पडते, असा अनुभव दुबईतील अनेकांना येत आहे,हे खरे आहे का, असेही मिरांडा यांनी विचारले. यावर उत्तर देताना, या प्रकल्पातील पाणी हे धरणातून येणाऱ्या व शुद्धीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याइतकेच चांगले असेल, तशीच अट निविदेत घालण्यात आल्याची ग्वाही अभिजीत बांगर यांनी दिली.