गणरायाचे गुरुवारी आगमन झाले. मुंबई आणि राज्यभर मोठय़ा थाटामाटात, दणदणाटात गणेशोत्सव साजरा केला जात असताना मात्र मंत्रालयात शुक्रवारी अक्षरश: शुकशुकाट होता.
घरात, गल्लीत, वसाहतीत, गावात, उत्सव साजरा करणाऱ्यांसाठी मोठय़ा संख्येने कर्मचाऱ्यांनी दांडय़ा मारल्या. शुक्रवारी ६७७८ पैकी फक्त २९३५ म्हणजे केवळ ४५ टक्के कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याची नोंद झाली आहे.
गणरायाच्या आगमनादिवशी गुरुवारी शासकीय सुटी होती. मात्र दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही त्याचा परिणाम मंत्रालयात दिसला. सचिव व वरिष्ठ अधिकारी नेहमीप्रमाणे हजर होते व त्यांचे नियमित कामकाज सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मंत्रालयात विविध विभागांच्या कामकाजांचा आढावा घेतला. मात्र कर्मचारी मोठय़ा संख्येने गैरहजर असल्याचे दिसले.