मुंबई : ९७ वर्षांची परंपरा, शून्य टक्के एनपीए, ५०० काेटींची उलाढाल आणि २९९ कोटींच्या ठेवी असलेल्या ‘दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफीसेस को-ऑपरेटीव्ह बँके’च्या (मॅको) पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर रोजी मतदान असून मतदार याद्या, आचारसंहिता भंगाच्या तक्रारी आणि चॅटबोट प्रचार यामुळे निवडणूक चर्चेत आली आहे.
१५ संचालकांसाठी निवडणूक होत असून ‘आपलं पॅनल’, ‘सभासद एकता’ आणि ‘सहकार पॅनल’ अशी तिरंगी निवडणूक होत आहे. एकुण ४१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सहकारी संस्थामध्ये संचालकांना दहा वर्षापेक्षा जास्त काळ पदे भूषवण्यास नव्या कायद्याने निर्बंध आले असल्याने अनेक ज्येष्ठ संचालकांना यावेळी मार्गदर्शक मंडळात आसरा घ्यावा लागला आहे.
पालघर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, रायगड आणि अहिल्यानगर असे बँकेचे कार्यक्षेत्र असून ६,०३८ सभासद आहेत. गुरुवारी आठ ठिकाणी मतदान होत असून शुक्रवारी मंत्रालयासमोर असलेल्या सचिवालय जिमखाना येथे मतमोजणी होणार आहे. दहा वर्षे बँकेवर सहकार पॅनेलची सत्ता आहे. कार्यालयनिहाय सभासदांच्या मतदार याद्या उपलब्ध करुन न दिल्याने आपल्याला सभासदांच्या भेटी घेता आल्या नाही तसेच प्रचारही करता आला नाही, अशी इतर दोन्ही गटाकंडून टीका केली जात आहे.
आचारसंहिता भंगाच्या दोन तक्रारी निवडणूक निर्णय अधिकारी विजयसिंह गवळी यांच्याकडे दाखल झाल्या आहेत. बँकेची श्वेतपत्रिका काढू, व्याजदर कमी करु, संचालकांच्या नातेवाईकांची भरती बंद करु, सभासदांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती, जामीनदारांच्या अटींमध्ये शिथीलता अशी निवडणूक जाहिरनाम्यात तिन्ही पॅनेलने भरभरून आश्वासने दिलेली आहेत.
प्रचारासाठी तिन्ही गटाकडून आधुनिक पर्याय वापरले जात आहेत. ‘सभासद एकता’ पॅनेलने सभासदांना मतदान केंद्र शोधता यावे यासाठी ‘अम्ब्रेला चॅटबोट’ची निर्मिती केली आहे. निवडणुकीत चॅटबोटचा पर्याय पहिल्यांदाच वापरला जात असून या हायटेक प्रचाराची जोरदार चर्चा आहे. गेला आठवडाभर तिन्ही पॅनेलचे उमेदवार मंत्रालयात गटागटाने प्रचार करत असून शासकीय कर्तव्यावर असताना त्यांचा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. कामानिमित्त मंत्रालयात आलेल्या अभ्यागतांना साहेब बैठकीला गेल्याचे उमेदवारांचे सहकारी यांच्याकडून सांगितले जाते. मंत्रालयाच्या सर्व सहा मजल्यावर तिन्ही पॅनेलने आपल्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दर्शनी जागी जाहिरात फलक लावले आहेत.
