मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने केलेली तपासणी आणि न्यायालयाने ओढलेले ताशेरे यामुळे मंत्रालय उपहारगृहाकडून पुरविल्या जाणाऱ्या खान-पान सेवेच्या स्वच्छतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावर तत्काळ कार्यवाही करीत सरकारने या उपहगारगृहाच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला असून मुख्य इमारतीतील उपहारगृह आणि विस्तारित इमारतीतील चौरस आहारगृहासाठी तीन कोटींचा खर्चाला मंजुरी दिली.
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रालयातील उपहारगृहाची तपासणी केली. त्यावेळी अन्नसुरक्षेसंदर्भातील बाबींची पूर्तता होत नसल्याचे आणि स्वच्छता पाळली जात नसल्याचे आढळून आले होते. तपासणीत स्वयंपाकाच्या ठिकाणी माशा आढळल्या होत्या. तसेच स्वयंपाकगृहात अस्वच्छता आणि पाणी साचल्याने आढळले होते. स्वच्छतेबाबत मंत्रालय उपहारगृहाची अनास्था समोर आल्याने खळबळ उडाली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालय उपहारगृहातील खानपानसेवा सुधारण्यावर आणि स्वच्छता राखण्यावर भर दिला आहे. उपहारगृहाच्या आधुनिकीकरणासाठी नागपूर शासकीय तंत्रनिकेतन कार्यालयातील विभागप्रमुख डॉ. प्रशांत विरखरे यांची तांत्रिक सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली होती .त्यांनी दिलेल्या अहवालानुसार उपहारगृह नूतनीकरणांतर्गत संरचनात्मक दुरुस्ती, फरशी, भिंतीवर फरशा बसविणे, स्वच्छ आणि धुण्यायोग्य पृष्ठभाग तयार करणे, स्वयंपाक घरातील धूर कमी करण्यासाठी यांत्रिक एक्झॉस्ट प्रणाली बसवणे, भांडी धुण्यासाठी पुरेसे सिंक, माशा प्रतिबंधक जाळी बसवणे, हात धुण्याची आणि गणवेश स्वच्छता मानकांचे पालन आदी उपाययोजना करण्यात येणार आहेत.
विद्युतविषयक कामावर दोन कोटीचा खर्च
मंत्रालय उपहारगृहाच्या नूतनीकरणासाठी ३८ लाख ४२ हजार तर चौरस आहारगृहाच्या नूतनीकरणाकरिता २६ लाख ५३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दोन्ही उपहारगृहातील विद्युतविषयक कामावर एकूण २ कोटी ३६ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या खर्चाला सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी या खर्चाला प्रशासकीय आणि वित्तीय मान्यता दिली.
