मुंबई : राज्याचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयात दररोज सरासरी तीन ते चार हजार अभ्यागत आपल्या विविध कामांसाठी दररोज येतात. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी ही संख्या दुप्पट होते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्री, राज्यमंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांमुळे मंत्रालयाचा परिसर अक्षरशः गजबजून जातो. गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ बैठकीचा दिवस वगळता मंत्रालयातील ही नेहमीची गर्दी दुष्काळाच्या सावटामुळे लक्षणीयरीत्या ओसरली आहे.
विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांतून नागरिक आपल्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आदल्या दिवशी मुंबईत किंवा मुंबई महानगर प्रदेशात येऊन मुक्काम करतात. मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशी सर्व विभागांचे मंत्री, राज्यमंत्री, सचिव, मुख्य सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी मंत्रालयात उपस्थित असतील, या अपेक्षेने गरजवंत नागरिक सकाळपासून मंत्रालयाबाहेर रांगा लावतात. दुपारी दोननंतर त्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जातो. अन्य दिवशी मंत्रालयातील अभ्यागतांची संख्या कमी होण्यामागे राज्यातील सध्याची परिस्थिती महत्त्वाची ठरत आहे.
राज्यातील सुमारे ८० टक्के भागात दुष्काळ जाहीर झाल्याने शासनाचे संपूर्ण लक्ष दुष्काळ निवारण आणि त्यासंबंधीच्या उपाययोजनांकडे केंद्रित झाले आहे. सरकारने विविध खर्चांना कात्री लावल्याने अनेक विकासकामे आणि खर्चिक प्रस्तावांना मर्यादा आल्या आहेत. परिणामी, कामांच्या मंजुरीसाठी, निधीसाठी किंवा नव्या योजनांच्या पाठपुराव्यासाठी मंत्रालयात येणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. दुसरीकडे राज्यातील विविध भागांत विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी आणि कंत्राटदारांची आंदोलने सुरू आहेत. त्यामुळे शासनासमोर एकाच वेळी अनेक प्रश्न उभे राहिले असून प्रशासनावरही त्याचा ताण जाणवत आहे.
मंत्रालयात सध्या एकूण ४० ते ४२ विभाग आहेत. या विभागांमध्ये नेहमीची प्रशासकीय कामे सुरू असली तरी दुष्काळ, आर्थिक मर्यादा आणि आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक विभागांमध्ये उत्साहाऐवजी गांभीर्याचे वातावरण जाणवत आहे. पितृपक्षामुळे काही मंत्री आणि अधिकारी शुभकार्ये टाळत असल्यानेही वातावरणावर त्याची छाया असल्याचे दिसते. दररोज हजारो नागरिकांच्या प्रश्नांना सामोरे जाणारे मंत्रालय सध्या दुष्काळाच्या सावटाखाली काहीसे शांत झाले आहे.
