मुंबई :मंत्रालय प्रवेश सुलभ आणि सुरक्षित करण्याकरिता आठ महिन्यांपूर्वी आलेल्या ‘डिजी प्रवेशा’चे हजारो पास गहाळ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची मंत्रालयात प्रवेश करताना कमालीची फरफट होते आहे. मंत्रालयातून बाहेर पडताना प्रवेशिका प्रवेशद्वारावर जमा करणे बंधनकारक आहे. परंतु, अनेकांनी त्या जमाच न केल्याने तब्बल १० ते १२ हजार प्रवेशिका गहाळ झाल्या आहेत. परिणामी नव्याने प्रवेशाकरिता येणाऱ्यांना देण्यासाठी मंत्रालयाच्या डिजी प्रवेश यंत्रणेकडे पुरेशा प्रवेशिकाच नाहीत.
अपुऱ्या प्रवेशिकांमुळे सध्या मंत्रालयाच्या गार्डन गेट या प्रवेशद्वारावर गोंधळांची परिस्थिती निर्माण होत आहे. यात सर्वसामान्यांची फरफट तर होते आहेच, शिवाय ‘डिजी प्रवेशा’च्या सुलभ आणि सुरक्षित मंत्रालय प्रवेशाच्या उद्देशालाही हरताळ फासला गेला आहे.
राज्य सरकारने ऑगस्ट, २०२५ पासून ही नवीन डिजिटल प्रणाली लागू केली. या यंत्रणेद्वारे दुपारी दोन नंतरच प्रवेश दिला जातो. त्यावेळी प्रवेशद्वारावर मोठी गर्दी उसळते. ही व्यवस्था अंगवळणी न पडलेल्यांचा डीजी प्रवेशाकरिता लागणारे अॅप डाऊनलोड करून त्यात नोंदणी करण्याच्या प्रक्रियेत बराच वेळ जातो. त्यानंतर आधारद्वारे ओळख आणि चेहरा पडताळणी करणे, भेटीचा विभाग आणि वेळ निश्चित करणे आणि सर्वात शेवटी क्यू आर कोडद्वारे डिजिटल प्रवेशिका तयार करणे, अशी ही प्रक्रिया आहे. स्मार्टफोन वापराला सरसावलेल्यांचे यामुळे फारसे अडत नाही. परंतु, ज्यांना जे जमत नाही, ते इतरांच्या मदतीने हे सोपस्कार पार पाडत असतात. त्यातच ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही ते आधार कार्ड, किंवा तत्सम ओळखपत्र दाखवून आता सोडा, म्हणून विनंती करत असतात. अर्थात त्याला दाद मिळत नाही. दुपारच्या रणरणत्या उन्हात हे असे प्रचंड गोंधळाचे वातावरण मंत्रालय प्रवेशद्वारावर असते. यात आता डिजिटल प्रवेशिकाच अपुऱ्या पडल्याने भर पडली आहे.
स्मार्टफोनवरील क्यूआर कोड स्कॅन करून डिजिटल प्रवेशिका देणाऱ्या अनेक खिडक्या प्रवेशद्वारावर आहेत. परंतु, त्यांच्याकडच्या प्रवेशिका संपल्यावर ते हात वर करतात. क्यूआर कोड काढलेल्यांना तसेच प्रवेशद्वारावरच्या पोलिसांकडे पाठविले जाते. पण पोलिसांना याबाबत सूचना नसल्याने त्यांची आणि अभ्यागतांची हुज्जत चालते. डीजी प्रवेश यंत्रणा राबविणारी यंत्रणा आणि पोलिस यांच्यात समन्वय नसल्याने अनेकदा सुरक्षाविषयक तपासणीचे दिव्य पार पाडल्यानंतर आत प्रवेश मिळूनही प्रवेशिका नाही म्हणून परत बाहेर पाठविले जाते. या सगळ्याचा मोठा मनस्ताप सोसावा लागत असल्याने अभ्यागतांमध्ये डिजी प्रवेशाविषयी प्रचंड नाराजी आहे.
जवळपास १० ते १२ हजार प्रवेशिका गहाळ आहेत. त्या परत मिळविण्याकरिता आम्ही संबंधितांशी संपर्क साधतो आहोत. अनेकांनी त्या परतही आणून दिल्या. तरीही त्या अपुऱ्या पडत आहेत. वारंवार सूचना देऊनही प्रवेशिका परत न देणाऱ्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहेत. म्हणजे त्यांना पुन्हा कधीही मंत्रालयात प्रवेश दिला जाणार नाही. – अनुप कुमार सिंग, प्रधान सचिव, गृह विभाग
