मुंबई: तोंडी आणि उसनवारी तत्त्वावर मंत्र्यांकडे कार्यरत असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्य सचिवांच्या आदेशाने मूळ विभागात रुजू व्हावे लागल्यानंतर आता त्यांना मंत्रालयात चेहरापडताळणीद्वारे दिला जाणारा थेट प्रवेशही बंद करण्यात आला आहे. ४१५ अधिकारी-कर्मचाऱ्यांची ही सुविधा बंद करण्यात आली असून ओळखपत्र क्रमांकाच्या आधारे गृह विभागाकडून ही कारवाई करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांची मंत्रालयीन ओळखपत्रेही जमा करून घेण्यात आली आहेत.
उसनवारी पद्धतीने आणि तोंडी आदेशाने मंत्री आस्थापनेला चिकटून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका रद्द करण्याबाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी परिपत्रक जारी केले होते. शासकीय नियमात उसनवारी किंवा तोंडी आदेशाने कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची तरतूद नाही. तरीही बहुतांश कर्मचारी नियमबाह्य पद्धतीने मंत्री कार्यालयात सेवा देत असल्याने त्याचा परिणाम मूळ विभागाच्या कामकाजावर होत असल्याचे मुख्य सचिवांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे मुख्य सचिवांनी २५ ऑगस्ट २०२६ रोजी शासन परिपत्रक जारी करत मंत्री आस्थापनेवर नियमबाह्यपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात धाडण्याचा निर्णय घेतला होता.
कार्यमुक्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची मंत्रालयातील चेहरा पडताळणी सुविधा बंद करण्याची सूचना मुख्य सचिवांनी केली होती. या सूचनेची गृह विभागाकडून अंमलबजावणी सुरु आहे. आतापर्यंत ४१५ जणांची सुविधा बंद करण्यात आली असून येत्या काही दिवसात आणखी काहींची सुविधा बंद केली जाईल. त्यामुळे या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आता डीजी प्रवेश ऍपद्वारे मंत्रालयात प्रवेश मिळेल, अशी माहिती गृह विभागाच्या सूत्रांनी दिली.
अशा कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबर २०२६ पूर्वी मूळ विभागात पाठवण्याचे आणि यासंदर्भातील अहवाल सादर करण्याच्या सूचना परिपत्रकात देण्यात आल्या होत्या. त्यानुसार जवळपास ६२५ अधिकारी -कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करून त्यांना त्यांच्या मूळ विभागात पाठवण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने मुख्यमंत्री सचिवालयासह मंत्री आणि राज्यमंत्री कार्यालयासाठी प्रतिनियुक्तीची एकूण ९०४ पदे मंजूर केली आहेत. यापैकी ५४९ पदांवर नियुक्ती झाली असून तब्बल ३५५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर मंत्र्यांनी आपल्या मर्जीतील ६२५ हून अधिक जणांची वर्णी लावण्याचे या कारवाईने उघड झाले.
अहवालानंतरच मिळणार थेट प्रवेश
मंत्रालयातील काही अधिकारी-कर्मचारी मंत्री आस्थापनेवर नियमबाह्यपणे काम करत होते. त्यांना तेथून कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर त्यांचा मंत्रालय प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता. हे अधिकारी-कर्मचारी मूळ विभागात रुजू झाल्याचा अहवाल आल्यानंतरच या कर्मचाऱ्यांची चेहरा पडताळणी सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचे गृह विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
