मुंबई : ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी साप्ताहिक सुट्टी असून १० आणि ११ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा व भाऊबीजनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. ९ नोव्हेंबर रोजी विशेष बाब म्हणून सार्वजनिक सुट्टी दिल्यास सलग पाच दिवस सुट्ट्या येतील. दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी ९ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी महाराष्ट्र मंत्रालय अधिकारी संघटनेने केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यासंदर्भात संघटनेने बुधवारी पत्र लिहिले आहे. दिवाळीचे महत्त्व आणि सणासाठी गावी गेल्यानंतर पुन्हा ९ नोव्हेंबर या एका दिवसासाठी मुंबईत घाईघाईने परतावे लागणार आहे. यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे. ९ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी राहील. या काळात कामानिमित्त मंत्रालयात येणारे अभ्यागतही अल्प असणार आहेत.

मुंबई महानगरात कर्तव्य बजावणारे शासकीय कर्मचारी आपली गावी दिवाळी साजरी करतात. या सर्व परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि ९ नोव्हेंबर रोजी विशेष बाब म्हणून राज्य शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी, असे संघटनेच्या अध्यक्षा यमुना जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

सौजन्य – लोकसत्ता टीम

१२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी शासकीय कार्यालये नियमित सुरू आहेत. त्यानंतर १४ आणि १५ रोजी पुन्हा दोन दिवस साप्ताहिक सुट्टी येत आहे. त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांचा सलग सुट्ट्या घेण्यासाठी या तीन दिवसांत रजा टाकण्याकडे कल राहणार आहे. ७ नोव्हेंबरपासून दिवाळी सुट्ट्यांना प्रारंभ होत असून १५ नोव्हेंबर रोजी म्हणजे तब्बल ९ दिवसांनी पूर्ण क्षमतेने मंत्रालय सुरू होणार आहे.

त्यातच पुढच्या महिन्यात नागपूरचे हिवाळी अधिवेशन आहे. अधिवेशन काळात शासकीय कर्मचाऱ्यांना रजा घेता येत नाही. त्यामुळे वर्षभरातील शिल्लक रजा संपवण्याकडे कर्मचाऱ्यांचा या महिन्यात कल असणार आहे. त्यामुळे सात ते पंधरा नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस शासकीय कार्यालय चालू राहणार आहेत, त्या काळात बहुसंख्य कर्मचारी रजा घेण्याची शक्यता आहे.