सहाय यांचा उद्दामपणा कायम; कर्मचारी संतप्त, सहाय यांच्या विरोधात वातावरण तापले

आत्महत्या केलेल्या मुलाच्या अंत्यसंस्काराकरिता मूळ गावी गेलेल्या सहसचिवाचा रजेचा अर्ज आहे कोठे, असा शेरा अतिरिक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी फाईलवर लिहिल्याने आधीच वातावरण तापलेल्या सहाय यांच्या विरोधात कर्मचारी आक्रमक झाले. असंवेदनशील अशा सहाय यांच्या विरोधात मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी गुरुवारी आंदोलन केल्यानंतर सरकारने सहाय यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

मुलाने आत्महत्या करण्याची धमकी दिल्याने घरी जाऊ द्यावे, अशी विनवणी कृषी विभागातील सहसचिव राजेंद्र घाडगे यांनी सहाय यांच्याकडे केली. पण सहाय यांनी घाडगे यांना घरी जाण्यास परवानगी दिली नाही. त्यातच मुलाने आत्महत्या केल्याने सहाय यांच्या विरोधात वातावरण तापले. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सहाय यांची चौकशी करण्याचा आदेश दिला.  ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचे तीव्र पडसाद आज मंत्रालयात उमटले.

सहाय यांचे प्रताप उघड झाल्याने मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. कर्मचारी आंदोलनासाठी बाहेर पडले. या संदर्भात सहाय यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी या संदर्भात काहीही बोलण्यास नकार दिला. आपण सरकारलाच वस्तुस्थिती सांगू, असे त्यांचे म्हणणे होते

सहाय यांचा उद्दामपणा मात्र कायम आहे. मुलांच्या अंत्यसंस्कारासाठी घाडगे गावी गेल्याची माहिती कृषी विभागातील कर्मचाऱ्यांनी अप्पर मुख्य सचिवांच्या निदर्शनास आणल्यानंतर घडल्या प्रकाराबद्दल सहानुभूती दाखविण्याऐवजी घाडगे यांच्या रजेचा अर्ज कोठे आहे, अशी लेखी विचारणा करीत सहाय यांनी पुन्हा एकदा आपल्या असंवेदनशीलचे दर्शन घडविले. मंत्रालय कर्मचाऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ निदर्शने करून सहाय्य यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहाय यांच्या दडपशाही कारभाराविरोधात निदर्शने केली.  कृषी विभागातील कर्मचाऱ्यांबरोबरच अन्य विभागातील कर्मचारीही या निदर्शनात सहभागी झाले होते. यावेळी घाडगे यांच्या मयत मुलास श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांची भेट घेऊन सहाय्य यांच्या हुकूमशाही कारभाराचा पाढा वाचत या विभागातून अन्यत्र बदली करण्याची मागणी केली. यासदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसह कृषी मंत्री, मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात  सहाय यांच्या मनमानी आणि दडपशाही कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मे मध्ये कृषी विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून दाखल झाल्यापासून सहाय्य यांनी विभागात दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.

अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून यापूर्वीही सहाय्य यांच्यामुळेच भाऊराव धुम या कक्ष अधिकाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अवर सचिवालाही सहाय्य यांनी बैठकीत अपमानीत करून बाहेर हाकलले होते. त्याबाबत या अधिकाऱ्याने केलेल्या तक्रारीनंतर त्या विभागाचे अप्पर मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांनी सहाय यांच्या या कृतीबद्दल थेट मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती.

काँग्रेस, शिवसेनेचा कर्मचाऱ्यांना पाठिंबा

या घटनेबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही संताप व्यक्त केला आहे. ही गंभीर बाब असून सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून घडलेली घटना खरी असेल तर सहाय यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. मंत्रालयात अशी घटना घडणे ही चिंताजनक बाब असून काँग्रेस सरकारी कर्मचाऱ्याच्या पाठिशी खंबीरपणे असल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या प्रवक्तया निलम गोरे यांनीही या घटनेस जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.