Premium

करुणेची मात्रा वाढायला हवी! ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठींचे प्रतिपादन

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला कलाकार असूनही त्यांची साधी राहणी, गावाकडच्या आठवणीत त्यांचे रमणे या गोष्टी सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करतात.

pankaj tripathi in loksatta gappa event,
लोकसत्ता गप्पा’मध्ये पंकज त्रिपाठी

मुंबई : एकमेकांच्या हिताचा विचार आणि आपल्या मनातील संवेदना जागृत ठेवत करुणेची मात्रा वाढवण्याचा प्रयत्न केला तर दैनंदिन समस्यांचे सहजपणे निराकरण होईल, असा विश्वास अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी व्यक्त केला. हिंदी चित्रपटसृष्टीतील वलय आणि प्रसिद्धीपासून दूर राहात आपल्या कलेतील सच्चेपणा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्रिपाठी यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू ‘लोकसत्ता गप्पा’च्या निमित्ताने उलगडत गेले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहज अभिनय आणि लक्षवेधी भूमिकांसाठी नावाजलेले पंकज त्रिपाठी यांच्याशी संवाद साधण्याचा योग रविवारी, नेहरू सेंटर येथे झालेल्या ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला. उत्तर प्रदेशमधील लहानशा खेडय़ातून आलेला तरुण ते यशस्वी अभिनेता होण्याच्या प्रवासात आलेली आव्हाने, एनएसडीच्या प्रशिक्षणातील अनुभव, नावाजलेल्या भूमिकांमागील किस्से अशा अनेक विषयांवर पंकज यांना बोलते करत ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी ही संवादमैफल खुलवली. हिंदी चित्रपट दिग्दर्शक अमित राय, रवी जाधव यांच्यासह हिंदी-मराठी चित्रपट वर्तुळातील अनेक नावाजलेले कलाकार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर यावेळी पंकज यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित होते.

हेही वाचा >>> सुनावणी आजपासून; आमदार अपात्रता याचिका अखेर मार्गी, तीन ते चार महिने लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांवर टांगती तलवार

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेला कलाकार असूनही त्यांची साधी राहणी, गावाकडच्या आठवणीत त्यांचे रमणे या गोष्टी सर्वसामान्यांना आश्चर्यचकित करतात. याबद्दल बोलताना गावचा विषय निघाल्यावर आपण अधिक भावुक होतो हे त्यांनी मान्य केले. अलीकडे गावही बदलले आहे. बदल हा अपरिहार्य असतो, तरीही बदल होत असताना लोप पावत चाललेली नीतिमूल्ये जपायला हवीत. पानगळीत झाडावरची पाने गळून पडतात. इतस्तत: विखुरल्या जाणाऱ्या पानांनी आपले मूळ विसरता कामा नये, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली. मुंबईतही विविध भागांमध्ये अनेक लहान लहान गावे वसली आहेत. काही भागात कोकण आहे, विदर्भ आहे असा विविध प्रांतिक अनुभव मुंबईतही येतो. कांदिवलीतील चारकोप परिसर म्हणजे अर्धा कोकण आहे असा उल्लेख करताना दशावताराच्या कलेचे धडे इथेच आपण घेतले, असेही त्यांनी सांगितले.

पंकज त्रिपाठी उत्तम अभिनेते आहेत, पण ते उत्तम नर्तकही असल्याचे इंगित या गप्पांदरम्यान उलगडले. छाऊ, कलरी, दशावतार या लोककलांचे ज्ञान आपल्याला असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या शरीराला ताल आणि सूर दोन्हीचा समतोल साधता आला पाहिजे या जाणिवेतून लोककलांचे शिक्षण घेण्यावर भर दिला होता. असे असले तरी चित्रपटातील अभिनय पूर्णत: वेगळे आहे. त्यासाठी शास्त्रशुद्ध प्रशिक्षण आवश्यक आहे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. आत्तापर्यंत केलेल्या विविधांगी भूमिकांमधून अभिनयसंपन्नतेबरोबरच माणूस म्हणूनही समृद्ध होत गेलो, असे त्यांनी सांगितले. अभिनय आणि जगणे दोन्हींना जोडून घेणारे साधे तत्त्वज्ञान, कलाकार आणि माणूस म्हणून सुरू असलेले द्वंद्व, व्यावहारिक जगात वावरताना सच्चेपणा जपण्याची धडपड अशा विविध विषयांवर त्यांनी मनमोकळय़ा गप्पा मारल्या.

अलीकडे गावही

बदलले आहे. बदल हा अपरिहार्य असतो, तरीही बदल होत असताना लोप पावत चाललेली नीतिमूल्ये जपायला हवीत. पानगळीत झाडावरची पाने गळून पडतात. इतस्तत: विखुरल्या जाणाऱ्या पानांनी आपले मूळ विसरता कामा नये. – अभिनेता पंकज त्रिपाठी,

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Many aspects of pankaj tripathi personality revealed during loksatta gappa event zws

First published on: 25-09-2023 at 04:43 IST
Next Story
सुनावणी आजपासून; आमदार अपात्रता याचिका अखेर मार्गी, तीन ते चार महिने लागण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांवर टांगती तलवार