फ्लिपकार्टसह अनेक ब्रँड्स ऑफलाइन व्यवसायात उतरण्याच्या तयारीत

किराणा मालापासून ते अगदी उंची दागिन्यांपर्यंत सर्वच गोष्टी ऑनलाइन बाजारात उपलब्ध करून दिल्यानंतर आता या ई-व्यापार संकेतस्थळांनी ऑफलाइन दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये फ्लिपकार्टसारख्या मोठय़ा कंपनीचाही समावेश असून अर्बन लॅडर आणि मिंत्रासारख्या कंपन्याही ऑफलाइन दुकाने सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

ज्या कंपन्यांना त्यांच्या ब्रँड्सची विक्री फ्लिपकार्टच्या नावाचा वापर करून करायची असेल अशा कंपन्यांनी विक्रेते भागीदार म्हणून फ्लिपकार्टसोबत करार केल्यास कंपनीचे नाव त्यांच्या दुकानाला उपलब्ध होणार आहे. यामध्ये कंपनीच्या नावाचे पैसे आकारले जाणार असून फ्लिपकार्ट त्यात कोणतीही गुंतवणूक करणार नाही. यामुळे कंपनीला होत असलेल्या तोटय़ाची भरपाई करता येऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी अर्बन लॅडर या ऑनलाइन फर्निचर विक्रेत्या ब्रँडने बंगळूरुमध्ये साडेसात हजार चौरस फुटांचे दुकान सुरू केले होते. या दुकानाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून व्यवसायवृद्धीस चालना मिळाली. यामुळे शहरात चार ते साडेचार हजार चौरस फुटांच्या जागेत आणखी काही दुकाने उघडून मग देशातील इतर शहरांमध्येही दुकाने सुरू करण्याचा कंपनीचा मानस असल्याचे अर्बन लॅडरचे सहसंस्थापक आणि मुख्याधिकारी आशीष गोएल यांनी सांगितले. अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टपासून अनेक ऑनलाइन कंपन्यांना उत्पन्न मिळवण्याचे आव्हान आजही कायम आहे. यातून मार्ग काढण्यासाठी ऑनलाइनला आता ऑफलाइनची जोड देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही गोएल यांनी स्पष्ट केले.

तर फ्लिपकार्टच्या वस्त्र विभागाला मात देण्यासाठी एकत्रित आलेल्या जबाँग आणि मिंत्रा या दोन फॅशन ब्रँड्सनीही आता मुंबई आणि दिल्लीत त्यांची दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुकानांमध्ये ऑनलाइन बाजारातील सर्व ब्रँड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

यामुळे फ्लिपकार्टसारख्या मातब्बर स्पर्धकासमोर टिकाव धरणे शक्य होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आज ऑनलाइन फॅशन विभागात ५५ ते ६० टक्के हिस्सा हा फ्लिपकार्टचा आहे.

बाजारात नवी स्पर्धा

जगभरातील सर्व वस्तू एका क्लिकवर उपलब्ध करून देणाऱ्या या कंपन्या ऑफलाइन व्यवसायात येऊ लागल्यामुळे बाजारात नवी स्पर्धा निर्माण होणार आहे. या कंपन्यांमुळे शहरातील ऑफलाइन बाजारपेठ संपेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतानाच या कंपन्यांनी त्यांची दुकाने थाटण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे एकाच वेळी ऑफलाइन व ऑनलाइन अशा दोन्ही व्यासपीठांवर विक्री करण्याचा या कंपन्यांचा मानस आहे. परदेशातील बडय़ा ब्रँड्सना आकर्षित करण्यासाठी फ्लिपकार्टने ही युक्ती शोधली आहे. सध्या या कंपनीचे हाँगकाँग येथील गिओर्डानो या ब्रँडसोबत चर्चा सुरू आहे.

आमच्या कंपन्यांना तगवण्यासाठी व ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.

-अनंत नारायणन, मुख्याधिकारी  मिंत्रा आणि जबाँग