मुंबई : आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरून मराठा समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याने अखेर सावंत यांनी माफीनामा सादर केला आहे. सावंत यांना समज देण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. तर सावंत यांच्या राजीनाम्याची शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘राज्यात सत्ताबदल झाल्याने मराठा आरक्षणाची खाज आली ’, असे वक्तव्य सावंत यांनी उस्मानाबाद येथील कार्यक्रमात केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. आपण भाषणात काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहिले आहे का, असा सवाल करीत  समाजाची माफी मागावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी केली आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाचा समाचार घेताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मराठा आरक्षणाची मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातून विविध संघटना, राजकीय पक्ष यांचे प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयीन पातळीवरही हा लढा सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. २०१४ मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, परंतु त्यानंतर आलेल्या फडणवीस सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा आरक्षण संपुष्टात आले. आजही हा प्रश्न सुटावा व मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असताना राज्यातील एक मंत्री अशा प्रकारचे बेताल वक्तव्य करतो हे अत्यंत निषेधार्ह आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे मराठा समाजाबद्दल केलेले वक्त्वय बेजबाबदारपणाचे व म्हणूनच निषेधार्ह आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात सर्व आठरापगड जातीचे लोक राहतात. मराठा हा सर्वात मोठा समाज आहे. तो रस्त्यावर उतरला तेव्हा त्यांची ताकद साऱ्या देशाने पाहिली आहे. सावंत यांनी कोणत्याच समाजाबद्दल असे बेजबाबदार वक्तव्य करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. राष्ट्रवादीनेही सावंत यांच्या विधानाचा निषेध करीत राजीनाम्याची मागणी केली.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सावंत यांना समज देण्याची मागणी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सावंत यांचा माफीनामा

मराठा समाजाच्या आरक्षणावरून केलेल्या वक्तव्याची संतप्त प्रतिक्रिया उमटल्याने तसेच विरोधकांनी राजीनाम्याची मागणी केल्यावर आरोग्यमंत्री सावंत यांनी दिलगिरी व्यक्त केली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. मराठा आरक्षणासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असे सावंत यांनी म्हटले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha community upset health minister tanaji sawant maratha reservation zws
First published on: 27-09-2022 at 04:56 IST