मुंबई: मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीने हैदराबाद गॅझेटीअरनुसार आतापर्यंत राज्यभरात ५८ लाख ८९ हजार ६४१ मराठा कुणबी नोंदीचा शोध घेतला आहे. या नोंदीतून एका कुटुंबातील कमीत कमी चार जण अशा २ कोटींहून अधिक लोकांना लाभ होणार असला तरी प्रत्यक्षात कुणबी प्रमाणपत्रांसाठी करण्यात आलेली अर्जांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत शोधण्यात आलेल्या या नोंदीतून ११ लाख ८६ हजार २४७ लोकांनीच अर्ज केले असून त्यापैकी ११ लाख ७९ हजार ३८३ लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या समितीकडून २४ ऑक्टबर २०२३ पासून मराठा कुणबी नोंदी घेतल्या जात आहेत. हैदराबाद गॅझेटिअरमधील निजामकालीन नोंदींसाठी मराठवाडा तसेच हैदराबाद येथील कागदपत्रांची पाहणी केली. त्यानंतर या समितीने वेळोवेळी आपले अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आले. दरम्यानच्या काळात सातारा गझेटिअर लागू करण्याची मागणीही होऊ लागली. त्यानुसार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमिती याबाबत निर्णय घेणार असून आतापर्यंत हैदराबाद गॅझेटिअरनुसार सापडलेल्या नोंदी ५८ लाख ८९ हजार नोंदीनुसार आलेल्या अर्जांची संख्या फार कमी आहे.
११ लाख ८६ हजार अर्ज
५८ लाखांवर नोंदी सापडल्या असल्या तरी मागील दोन वर्षे तीन महिन्यांत मराठा समाजाकडून केवळ ११ लाख ८६ हजार २४७ लोकांनीच मराठा कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी कागदपत्रांअभावी ४४१५ अर्ज हे नामंजूर करण्यात आले असून २४४९ अर्ज प्रलंबित आहेत. एकूण ११ लाख ७९ हजार ३८३ लोकांनाच मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहेत.
सर्वाधिक अर्ज नाशिक विभागातून
सर्वाधिक २५ लाख ७४ हजार ३६९ नोंदी या अमरावती विभागात सापडल्या असल्या तरी या विभागातून आलेल्या अर्जांची संख्या ही केवळ १ लाख ४३ हजार ९४४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील १ लाख ४३ हजार ९३९ लोकांना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहेत. तर नाशिक विभागात ८ लाख २७ हजार ४६५ नोंदी आढळल्या असून सर्वाधिक ३,८२, ५८९ अर्ज याच विभागातून प्राप्त झाले असून ३,७९,३४५ लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळाले आहे.
विभाग – नोंदी – अर्ज – प्रमाणपत्र
कोकण – ८,२५,२४७ – ९१,६४१ – ९१, ४६६
पुणे – ७,०८,७४० – १,७६,४०९ – १,७४,२७७
नाशिक – ८,२७,४६५ – ३,८२,५८१ – ३,७९,३४५
छत्रपती संभाजीनगर – ४८,८४४ – २,६९,०५३ – २,६८,००३
अमरावती – २५,७४,३६९ – १,४३,९४४ – १,४३,९३९
नागपूर – ९,०४,९७६ – १,२२,६११ – १,२२,३५३

