मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण पुन्हा तापत आहे. सरकारने विलंब न करता तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री मराठा आणि ओबीसी समाजाच्या उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करणार आहेत. या बैठकीतून काय निष्पन्न होते, हे पाहावे लागेल. मात्र, उत्सवांच्या तोंडावर सामाजिक तणाव निर्माण होणे योग्य नाही. त्यामुळे सरकारने दोन दिवसांत मार्ग काढावा. मनोज जरांगे – पाटील यांचे समाधान होत नसल्याचे राधाकृष्ण विखे – पाटील यांनी केलेले वक्तव्य सरकारच्या अपयशाचे चित्र आहे. निवडणुकीच्या काळात राजकीय फायद्यासाठी आश्वासने देऊन सत्ता मिळवली, आता त्या आश्वासनांचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. प्रत्येक समाजाला आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यामुळे आता सरकारची परीक्षा आहे, असेही शिंदे म्हणाले.
सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होत नाहीत
मराठा आंदोलनाच्या प्रश्नावर सरकारमध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहे. सरकारकडून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याची भावना जरांगे पाटील यांच्यात निर्माण झाली आहे. अंतर्गत स्पर्धेमुळे आश्वासने पाळली जात नाहीत का, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारच्या अकार्यक्षमतेचा फटका सामान्य जनतेला बसत आहे, असेही शिंदे म्हणाले.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्या
एपीएससीच्या मुद्द्यावर रस्त्यावर उतरलेल्या तरुणांना पाठिंबा देणे हे सर्व राजकीय पक्षांचे कर्तव्य आहे. आंदोलन करणाऱ्या तरुणांच्या राजकीय सहभागाबाबत कोणी वक्तव्य करत असेल, तर ती आंदोलनाची थट्टा आहे, अशा वक्तव्यांचे परिणाम संबंधितांना महागात पडतील. अध्यक्षांनी परीक्षेत चूक झाल्याचे मान्य केल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आताचे अध्यक्ष आणि सचिव यांना जबाबदार धरले जाणार का, या पूर्वी अशा घटना घडल्या की संबंधित मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागत होता. आता एवढे पेपर फुटूनही राजीनामा होत नसेल तर त्याची किंमत सरकारला मोजावी लागेल, असेही शशिकांत शिंदे म्हणाले.
