मुंबई : सरकारी नोकऱ्या व शिक्षणात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याला विरोध करणाऱ्या याचिकांवरील सुनावणीसाठी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार व न्यायमूर्ती संदीप मारणे यांचे नवे पूर्णपीठ स्थापन करण्यात आले आहे. या नव्या पूर्णपीठापुढे येत्या ९ ऑक्टोबरपासून प्रकरणावर पुन्हा नव्याने सुनावणी सुरू होणार आहे.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती होण्यापूर्वी न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती जमादार आणि न्यायमूर्ती मारणे यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची जवळपास गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारतर्फे राज्याचे महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांचा युक्तिवाद सुरू होता. तथापि, न्यायमूर्ती घुगे यांची कोलकाता उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याने नियमानुसार प्रकरणाची पूर्णपणे नव्याने सुनावणी सुरू होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रकरणाच्या नव्याने होणाऱ्या सुनावणीसाठी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील नवे पूर्णपीठ स्थापन करण्यात आले.
या नव्या पूर्णपीठापुढे शुक्रवारी प्रकरणाची पहिली सुनावणी पार पडली. त्यावेळी आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते संजीत शुक्ला यांच्यावतीने वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी या याचिकांवरील नव्याने सुनावणीची ही तिसरी वेळ असल्याचे न्यायालयाला सांगितले. यापूर्वी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे प्रकरणाची सुनावणी झाली. परंतु, त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात बदली झाल्यानंतर आणि मराठा नेते मनोज जरांगे यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती घुगे यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठ प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आले होते.
या पूर्णपीठापुढे गेल्या वर्षभरापासून नियमित सुनावणी सुरू होती. न्यायमूर्ती घुगे यांचीही कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याने आता या पूर्णपीठापुढे प्रकरणाची नव्याने सुनावणी होत आहे, असे संचेती यांनी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाला सांगितले. त्यानंतर, त्यांनी प्रकरणाची दररोज आणि अतिरिक्त वेळ सुनावणी घेऊन प्रकरण निकाली काढण्याचीही विनंती केली.
मात्र, इतर प्रकरणे आणि कामाच्या ताणामुळे तूर्त अशा पद्धतीने प्रकरणाची सुनावणी घणे शक्य नसल्याचे न्यायमूर्ती कर्णिक यांनी स्पष्ट केले. तसेच, प्रकरणाची येत्या ९ ऑक्टोबरपासून सुनावणी सुरू करण्याचे नमूद करून सुरुवातीला याचिकाकर्त्यांतर्फे, मग राज्य सरकार आणि नंतर राज्य मागासवर्ग आयोग व अखेरीस आरक्षणाच्या समर्थनार्थ हस्तक्षेप याचिका करणाऱ्यांचे म्हणणे ऐकले जाईल, असे पूर्णपीठाने स्पष्ट केले.
