लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मराठा समाज नेहमीच पुढारलेला आणि मुख्य प्रवाहात राहिलेला असल्याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. असे असताना सर्वोच्च न्यायालयाच्या या निष्कर्षाकडे दुर्लक्ष करून राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नाही, असा दावा आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अरविंद दातार यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात केला.

या समाजाचे विशेषकरून दुर्गम भागातील काहीजण मुख्य प्रवाहापासून नक्कीच अलिप्त आहेत आणि असतील. मात्र, या काही जणांमुळे संपूर्ण मराठा समाजाला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात सरसकट १० टक्के आरक्षण देता येणार नाही, असा दावाही दातार यांनी हे आरक्षण घटनाबाह्य ठरवून रद्द करण्याची मागणी करताना केला. सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल याचिकांवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या नव्याने स्थापन केलेल्या विशेष पूर्णपीठासमोर शुक्रवारपासून नियमित सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी नव्याने युक्तिवाद होण्याची ही तिसरी वेळ आहे.

देशात तामिळनाडू वगळता अन्य कोणत्याही राज्याने ५० टक्के आरक्षणाची लक्ष्मणरेषा ओलांडलेली नाही. तामिळनाडूमध्ये ६९ टक्के आरक्षण लागू आहे, असे दातार यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले. तामिळनाडूत हे कसे घडले हेही त्यांनी विशद केले. तत्कालिन तामिळनाडू सरकारने तत्कालिन केंद्रीय गृहमंत्र्यांना हे आरक्षण घटनेच्या परिशिष्ट ९ मध्ये समाविष्ट करण्याची विनंती केली. त्यानंतर, त्यावर राष्ट्रपतींची मोहोर उठली. तथापि, हे आरक्षण न्यायालयीन पुनरावलोकनासाठी प्रलंबित आहे याकडेही दातार यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी प्रकरणात घालून दिलेल्या ५० टक्के आरक्षणाची मर्यादा कोणत्याही राज्याला ओलांडता येत नसल्याचे आणि या निकालाच्या पुनर्विचाराची मागणीही सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी फेटाळल्याचे दातार यांनी न्यायालयाच्या निदर्शास आणून दिले.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरक्षणाचा घाट

मराठा समाजाला २०१४, २०१८ आणि २०२४ मध्ये आरक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला. या तिन्ही वेळी राज्यात निवडणुकांचे वारे वाहत होते. त्यामुळे, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा घाट घातला गेल्याचा दावा वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी केला. निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मागासवर्ग आयोगाने केलेल्या सर्वेक्षणावरही संचेती यांनी यावेळी बोट ठेवले. मराठा समाज हा २०२० पर्यंत पुढारलेला होता, मग त्यानंतरच्या काळात तो मागास ठरवण्यासाठी असे काय घडले ? याबाबत न्यायमूर्ती शुक्रे आयोगाच्या अहवालातून काहीच उल्लेख नसल्याकडे संचेती यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. मराठा मागास असल्याचे दर्शवण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. मात्र चुकीच्या पद्धतीने ही सर्व्हेक्षण प्रक्रिया राबविण्यात आली असल्याने त्यातील अनुमान आणि निष्कर्ष चुकीचे असल्याचा दावाही त्यांनी केला.