औरंगाबाद वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेल्या तोडफोडीचा मराठा मोर्चाशी काहीही संबंध नाही. एमआयडीसी परिसरातील कंपन्यांमध्ये झालेल्या तोडफोडीची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी औरंगाबाद येथील मराठा मोर्चा समन्वय समितीने केली आहे. शुक्रवारी दुपारी मराठा मोर्चा समन्वय समितीने पत्रकार परिषद घेऊन वाळूंज एमआयडीसीमध्ये मराठा मोर्चाच्या आंदोलकांनी तोडफोड केल्याचा आरोप फेटाळून लावला.

वाळूंज एमआयडीसीमध्ये झालेल्या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नाही. मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते वेगवेगळया चौकात आंदोलनाला बसले होते. दुसऱ्याच कोणीतीरी ही तोडफोड केली आहे. त्यामुळे मराठा समाजाचे नाव खराब होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी समन्वय समितीने केली आहे. आमचा मार्ग शांततेचा असून कुठल्याही प्रकारच्या हिंसाचाराला आमचं समर्थन नाही असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

वाळूंज एमआयडीसीमध्ये ९० टक्के मराठा समाज काम करतो याची आम्हाला कल्पना आहे. या तोडफोडीचा आम्ही निषेध करतो. आमच्या कार्यकर्त्यांना विनाकारण यामध्ये गोवण्यात येत आहे असा दावा समन्वय समितीने केला आहे. वाळूंज एमआयडीसीतील तोडफोड केवळ एमआयडीसीची नाही तर ती अस्मितेची तोडफोड आहे असे मराठा मोर्चा समन्वय समितीने म्हटले आहे.

तोडफोड झालेल्या कंपन्यांमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना द्या. चेहरा लपवून तोडफोड करण्यात आली आहे. यापूर्वी कोणतीही तोडफोड केली नव्हती. मग आताच का झाली? म्हणूनच या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे असे समन्वय समितीने म्हटले आहे.
आम्ही तोडफोड करणारे नाही तर शांततेने मोर्चे काढणारे आहोत. आम्ही लवकरच एमआयडीसीमधील कंपन्यांच्या मालकांची भेट घेऊ असे समन्वय समितीने म्हटले आहे. १५ ऑगस्टपासून अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे समन्वय समितीने सांगितले.