मराठा आरक्षण आंदोलनाची आग अजूनही क्षमलेली नसून राज्याच्या वेगवेगळया भागात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलने, मोर्चे सुरुच आहेत. शुक्रवारी नांदेड जिल्ह्यातील आमदुरा येथे मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. यावेळी आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी झाले.

आमदुरा येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी वाटेत अडवले. त्यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. लगेचच या घटनेचे शेजारच्या पुणे गावात पडसाद उमटले. संतप्त आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. यावेळी झालेल्या दगडफेकीत १३ पोलीस जखमी झाले.

अमदुरामध्ये काही तरुणांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गोदावरी नदीत जलसमाधी आंदोलन करण्याची घोषणा केली. सकाळी अकराच्या सुमारास काही तरुण नदीच्या दिशेने चाललेले असताना पोलिसांनी त्यांना वाटेत अडवले. त्यावेळी दोन्ही बाजूंकडून सुरुवातीला शाब्दीक वादावादी झाली.

पोलीस आंदोलकांना पुढे जाऊ देत नव्हते त्यावरुन वाद वाढत गेला आणि अचानक दगडफेक सुरु झाली. संतप्त झालेल्या जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तसेच अश्रूधुराच्या नळकांडया फोडाव्या लागल्या. संतप्त जमावाने पोलिसांच्या चार गाडयांची तोडफोड केली व तिथे असलेल्या दुचाकींचेही नुकसान केले.