मुंबई : मराठा समाजातील सर्व विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याच्या धोरणात्मक निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही लागू कराव्यात, असे आदेश जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.
परराज्यांत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी आवश्यक पडताळणी करण्याचे सांगत या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या आर्थिक भाराचा अंदाज घेऊन ही योजना सुरू करावी. इयत्ता पाचवी ते दहावीतील एसईबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रस्तावित शैक्षणिक सवलती आणि शिष्यवृत्ती योजनांसाठी आगामी डिसेंबर अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे आर्थिक तरतूद करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
एसईबीसी प्रवर्गातील बेरोजगार युवक- युवतींसाठीची मोटार वाहन चालक-वाहक प्रशिक्षण योजना केवळ पुणे येथे केंद्रित न ठेवता परिवहन विभागाच्या कार्यालयांमार्फत जिल्हास्तरावर राबवावी. त्यासाठी ‘सारथी’ने नवीन जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागवावेत. शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक शुल्क योजना या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना लागू करण्यासाठी विहित कालमर्यादेत शासन निर्णय जारी करण्याची कार्यवाही पूर्ण करावी, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे सचिव अप्पासो धुळाज यांनी बैठकीत विविध योजनांबाबत सादरीकरण केले. बैठकीस माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, ‘सारथी’च्या निबंधक समीक्षा चंद्रकर, उपव्यवस्थापकीय संचालक अनिल पवार आदी उपस्थित होते.
