मुंबई : संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी, चक्रधर स्वामींच्या लिळाचरित्रांपासून अनेक संतांचे अभंग, छत्रपती शिवाजी महाराजांनी जनमानसामध्ये रुजवलेली मराठी भाषा आणि संस्कृतीविषयीची निर्माण केलेली उमेद तसेच आजवरच्या अनेक साहित्यिकांनी त्यांच्या साहित्यातून मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले आहे. इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण, आपल्या मुलांनी, तरुणांनी मराठी भाषा विसरता कामा नये. मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत कराव्यात, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी व्यक्त केले.
कविवर्य कुसुमाग्रज तथा वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा’ शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. मराठी भाषेचे वैभव पाहायचे असेल तर एकदा तरी संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली ‘ज्ञानेश्वरी’ प्रत्येकाने वाचायला हवी. मराठी भाषेचे अवकाश किती मोठा आहे हे ज्ञानेश्वरीच्या एकेका शब्दातून कळते. ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग यांच्यापैकी भक्तीयोगातून वारकरी पंथ आला.
पंढरीच्या विठ्ठलास केंद्रस्थानी ठेवून विविध अभंगांद्वारे वारकरी पंथाने संपूर्ण महाराष्ट्राला जोडण्याचे काम केले. अनेक जाती-धर्मांचे संत झाले पण त्यांनी त्यांच्या अभंगातून मराठी भाषेला संपन्न आणि समृद्ध करण्याचे कार्य केले. आपली मराठी भाषेशी नाळ जुळलेली आहे. याचा अर्थ अन्य भाषा अवगत करण्याची गरज नाही, असा होत नाही.
जगभरातील काम, संपर्क, ज्ञान आदींसाठी एक भाषा आवश्यक असते. पण ती अवगत करत असताना आपण मराठी भाषेपासून दूर जाता कामा नये. आपण आपली भाषा आणि संस्कृतीवर ठाम राहून इतर भाषा अवगत करायला हव्यात. भाषेचा प्रवास कायमच होत असतो. भाषा एकमेकांना जोडणारा पूल आहे. मराठी भाषा ही वैभवसंपन्न आहे आणि ही वैभवसंपन्नता अशीच कायम ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे, असे आवाहन डहाके यांनी केले.
मराठी भाषेचा जागर करण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले जातात. प्रत्येकाने मराठी भाषेत व्यवहार करावेत. मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. नगरसेवक, अधिकारी व नागरिकांनी मराठी भाषा पंधरवाड्यानिमित्त विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन रितू तावडे यांनी केले. जगभरात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे मराठी भाषेचा अभिमान बाळगला जातो. संत ज्ञानेश्वरांपासून प्रत्येक संतांनी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनेक योद्धांनी मराठी भाषेला महत्त्व दिले. महिन्यात किमान एकतरी मराठी पुस्तक वाचण्याचा निश्चय आजच्या दिवशी प्रत्येकाने करायला हवे, असे आवाहनही उपमहापौर संजय घाडी यांनी केले.
त्यावेळी विरोधी पक्ष नेत्या किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्षा संध्या दोशी (सक्रे), शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, गटनेते अमेय घोले, गटनेते विजय उबाळे आदी उपस्थित होते.
महानगरपालिकेच्या संगीत व कला अकादमीच्या चमूने सुमधूर व प्रेरणादायी मराठी गौरव गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या ‘वैभव मराठीचे, सौंदर्य व्याकरणाचे’ या पुस्तिकेचे मोफत वितरण करण्यात आले. स्मिता गव्हाणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
एकपात्री अभिनय स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडाअंतर्गत आयोजित ‘एकपात्री अभिनय’ स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव यावेळी करण्यात आला. त्यात स्वाती शिवशरण (प्रथम), गणाधीश घाडी (द्वितीय), सुरेखा मराठे (तृतीय), योगेश माने (उत्तेजनार्थ), मंदार तांबे (उत्तेजनार्थ) यांचा समावेश होता.
