मुंबई : मराठी भाषा शिकणे ही सक्तीची बाब नसून महाराष्ट्राशी जोडले जाण्याचा एक मार्ग आहे. जन्मभूमी उत्तर प्रदेश, बिहार किंवा अन्य कोणतेही राज्य असले तरी महाराष्ट्र ही कर्मभूमी आहे. मराठी भाषेवर प्रेम करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर २० हजार हिंदी भाषिक रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी व्यवहार भाषा प्रशिक्षणाचे उत्तीर्ण प्रमाणपत्र शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

‘मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी येथे आहे,’ अशा शब्दात शिंदे यांनी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचा गौरव केला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी साहित्यिक, भाषातज्ञ, प्राचार्य, शिक्षक आणि मराठीप्रेमींना सोबत घेऊन हे काम केले त्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. मराठी भाषा तोडणारी नव्हे, तर जोडणारी आहे. रिक्षा किंवा टॅक्सीमध्ये प्रवासी बसल्यानंतर ‘कुठे जायचे?’ एवढेच नव्हे, तर ज्येष्ठ नागरिकाला ‘हळू उतरा’, असे आपुलकीने सांगता आले पाहिजे. प्रवाशांनीही चालकांशी मराठीत संवाद साधावा. त्यामुळे मराठीचा वापर वाढण्याबरोबरच चालकांचा व्यवसायही वाढण्यास मदत होईल, असे शिंदे म्हणाले.

रिक्षा चालवण्याचा आपणासही सुरुवातीच्या काळातील अनुभव असल्याचे सांगितले.शिंदे यांनी रिक्षा-टॅक्सी सेवा ही केवळ वाहतूक व्यवस्था नसून एक प्रकारची सेवा आहे. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे करावा, असे आवाहन केले. प्रवाशांचे पैसे, दागिने किंवा अन्य मौल्यवान वस्तू सापडल्यानंतर त्या पोलिसांकडे जमा करणाऱ्या प्रामाणिक चालकांचे कौतुक केले. अशा चालकांचा समाजात आदर्श म्हणून गौरव केला जातो, असेही त्यांनी सांगितले.

मुंबईत राहणारा आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येक मुंबईकर हा आपला नातेवाईक, मित्र आणि आपला माणूस आहे, अशी भावना ठेवली पाहिजे, असे आवाहन शिंदे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या योगदानाचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. राज्यात पहिल्या टप्प्यात सुमारे १ लाख ६० हजार जणांनी मराठी भाषा शिकली असून, या उपक्रमाचा अभिमान बाळगावा आणि इतरांनीही मराठी शिकून तिचा प्रचार-प्रसार करावा, असे त्यांनी म्हटले. या कार्यक्रमास विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार मुरजी पटेल, आमदार प्रा. मनीषा कायंदे, शिवसेना सचिव सिद्धेश कदम यांच्यासह शिवसेनेचे खासदार, आमदार उपस्थित होते.

भोजपुरी संगीत आणि नृत्यांना आक्षेप

मराठी भाषा प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात शिंदे यांनी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांचे कौतुक केले. त्याचवेळी अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना खूश करण्यासाठी सुर्वे यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर उपस्थित महिला व्यासपीठावर येऊन नृत्य करीत असल्याचा चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्याने वाद निर्माण झाला. विरोधकांनी नृत्यावर टीका केली. एकीकडे मराठी भाषेचा अभिमान व्यक्त करायचा आणि दुसरीकडे अमराठींना खूश करण्यासाठी अमराठी गाणी वाजवली गेली. शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते अखिल चित्रे यांनी शिंदे पक्षावर जोरदार टीका केली. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमा असताना त्याच्यासमोर भोजपुरी गाण्यांवर नृत्य सादर करणे योग्य आहे का, असा सवाल चित्रे यांनी उपस्थित केला.