इंग्रजी अनुवाद करण्यावरही विचार सुरु
वांद्रे येथील साहित्य सहवासच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त नुकतेच प्रकाशित झालेले ‘कट्टय़ावरच्या गप्पा’ हे पुस्तक आता ‘ई-बुक’स्वरूपात वाचकांना ‘डाऊनलोड’ करता येणार आहे. तसेच या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करण्याबाबतही विचार सुरू आहे. या संकुलातील तेरा स्त्री-लेखिकांनी शब्दबद्ध केलेल्या या पुस्तकात कथा, निबंध, आत्मपर लिखाण अशा ललित गद्य लिखाणाचा समावेश आहे. http://www.dailyhunt.in या अॅपच्या माध्यमातून हे पुस्तक साहित्यप्रेमींना ‘डाऊनलोड’ करता येणार आहे.
मराठी साहित्यात स्वत:चे वैशिष्टय़पूर्ण स्थान निर्माण करून साहित्याला नवे परिमाण देणाऱ्या साहित्यिकांच्या साहित्य सहवास या संकुलाला या २६ जानेवारीला पन्नास वष्रे पूर्ण झाली.
यानिमित्ताने या संकुलातील १३ स्त्री-लेखिकांनी लिहिलेल्या ‘कट्टय़ावरच्या गप्पा’ या पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या हस्ते नुकतेच झाले. अल्प काळात लोकप्रिय झालेले हे पुस्तक ‘ई-बुक’स्वरूपात वाचकांना उपलब्ध व्हावे यासाठी ‘परचुरे प्रकाशन’ने पुढाकार घेतला आहे.
सहित्य सहवासातील दीपा गोवारीकर, अनुराधा आठवले, गिरिजा कीर, कल्याणी पगडी, हेमांगी रानडे, पुष्पा भारती, शालिनी प्रधान, सुकन्या आगाशे, वासंती गाडगीळ, उषा देशमुख, डॉ. विजया राजाध्यक्ष, वासंती फडके आणि नीलिमा भावे या १३ लेखिकांचा यात सहभाग आहे. पुस्तकाचे संपादन शाझिया गोवारीकर यांनी केले आहे.पुस्तकाचे मुखपृष्ठ मनसेचे अध्यक्ष, व्यंगचित्रकार राज ठाकरे यांच्या कुंचल्यातून सिद्ध झाले आहे.

मुद्रित पुस्तकाची प्रत परदेशात
साहित्य सहवास संकुलात राहणाऱ्या साहित्यिकांची बरीचशी नवी पिढी परदेशात आहे. त्यामुळे सध्या साहित्य सहवासातून १०-१० पुस्तकांचे गठ्ठे परदेशात पाठवले जात आहेत. याच आठवडय़ात अमेरिकेला एकगठ्ठा २५ पुस्तके पाठवली असल्याचेही सांगण्यात आले.

अमराठी वाचकांचा विचार
या पुस्तकाला मिळणाऱ्या यशानंतर आता हे पुस्तक इंग्रजी भाषेत करण्याचा विचार सुरू झाला आहे. काही दिवसांत या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद करून अमराठी वाचकांना तो वाचायला दिला जाणार आहे. मात्र प्रत्येक भाषेची एक लय असते. त्यामुळे मूळ गोष्टींना धक्का न लावता हे पुस्तक इंग्रजीत करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सहित्य सहवासातील एका रहिवाशाने सांगितले.

‘ई-बुक’सह ऑनलाइनही उपलब्ध
भविष्यातील ‘ई-बुक’ वाचकांची वाढती संख्या आणि तंत्राची वाढती हुकूमत लक्षात घेऊन मराठी वाचकांसाठी ‘कट्टय़ावरच्या गप्पा’ हे पुस्तक ई-बुकस्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहे. या पुस्तकाचे शुल्क आकारून ते डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय http://www.bookganga.com या संकेतस्थळावरही पुस्तक उपलब्ध होणार आहे. काही तांत्रिक बाबी शेवटच्या टप्प्यात असून लवकरच हे पुस्तक वाचकांच्या स्क्रीनवर उपलब्ध होईल. यासाठी ‘परचुरे प्रकाशन’कडून विशेष प्रयत्न केले जात आहेत, असे सुप्रसिद्ध छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांनी सांगितले.