मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हणून ओळखले जाणारे दादासाहेब फाळके यांनी चलचित्रांच्या माध्यमातून भारताला नवी दृश्यभाषा दिली. त्यानंतर भारतात चित्रपटयुगाला सुरुवात झाली. मागील शंभरहून अधिक वर्षांच्या इतिहासावर आधारित ‘मराठी चित्रपट : स्टोरीज अँड स्टारडम’ या प्रदर्शनाचे आयोजन नुकताच फोर्ट येथील राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालय (नॅशनल मॉडर्न आर्ट गॅलरी ) येथील डोम गॅलरीत करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासापासून ते अलीकडील चित्रपटातील रूपेरी क्षण रसिकांना अनुभवता येणार आहेत.
‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट ३ मे १९१३ रोजी गिरगावातील कोरोनेशन सिनेमागृहात प्रदर्शित झाला. तसेच १९३२ साली व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ हा पाहिला मराठी बोलपट प्रदर्शित झाला आणि पुढे मराठी चित्रपटाने उत्तरोतर प्रगती केली.

मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रसिद्ध नायक व नायिका यांच्या छायाचित्रांसोबतच चित्रपट दिग्दर्शक, पार्श्वगायिका यांची काही विशेष छायाचित्रेही या प्रदर्शनात आपल्याला पाहायला मिळतात. गौतम राजाध्यक्ष, साहिल सचदेवा, मंगेश पवार, शिरीष आर. कारळे, सुधारक ओलवे व प्रदीप चंद्रा आदी छायाचित्रकांनी टिपलेल्या विशेष छायाचित्रांसोबत संग्राहक नेहा कामत व एस. एम. औसाजा यांच्या संग्रहातील छायाचित्रांच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीच्या समृद्ध इतिहास मांडला जातो.

मराठी चित्रपट कसा बदलत गेला, त्याच्या विषयांमध्ये बदलत्या काळाचे प्रतिबिंब कसे पडत गेले याचा दृश्य इतिहास रसिकांना अनुभवता येईल. पु. ल. देशपांडे, राजा गोसावी, दादा कोंडके, चंद्रकांत गोखले, डॉ. काशिनाथ घाणेकर, जयश्री गडकर, सुलोचना लाटकर, आशा काळे ते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, भक्ती बर्वे, अश्विनी भावे, मृणाली कुलकर्णी, अश्विनी भावे, उर्मिला कानिटकर यासह अनेक कलाकारांची दुर्मीळ छायाचित्रे या प्रदर्शनात पाहता येतील.

तसेच काही चित्रपटांच्या चित्रीकरणादरम्यान काढलेली छायाचित्रे आणि काही प्रसिद्ध चित्रपटांची पोस्टर्सही या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. हे प्रदर्शन १० ऑगस्टपर्यंत मंगळवार ते शुक्रवार यादरम्यान सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत, तसेच शनिवारी आणि रविवारी सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत पाहता येईल.