आज सर्वत्र एक प्रकारची अस्वस्थता भरून राहिली आहे. सभोवताली धर्मांधतेचं खूळ तळापर्यंत बोकाळलंय. चंगळवाद आणि आपमतलबीपणाने माणसाचा मेंदू पार प्रदूषित झालाय. एकीकडे भव्यदिव्य प्रगतीचे आकडे सत्तापक्ष लोकांच्या तोंडावर फेकून झपाट्याने विकास होत असल्याचा आभास निर्माण करत आहे, तर दुसरीकडे या प्रगतीचा थेंबही तोंडात न पडणारे लाखो-करोडो लोक गर्तेतलं जिणं जगत आहेत. मध्यमवर्गीय आपल्याच सुखस्वप्नांत मग्न आहेत; जे खरं तर सत्तापक्षावर अंकुश ठेवू शकतात. परंतु तेच मुळात स्वार्थलोलुपतेत पुरते बुडाले आहेत. आणि समजा, एखाद्या कुणी याविरुद्ध आवाज उठवलाच, तर लगेचच त्याला देशद्रोही ठरवून त्याच्या विरोधात ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स वगैरेंचं शुक्लकाष्ठ लावून त्याला त्राही भगवान करून सोडलं जातं. सर्वत्र भ्रष्टाचार, कंत्राटबाजी, अनाचार, अनैतिकता, धर्मांधता, इव्हेन्टीकरण यांचा एकच नंगानाच सुरू आहे. आणि डोळ्यांवर कातडं ओढलेल्या लोकांनाही त्यात आता काही वावगं घडतंय असं वाटेनासं झालं आहे. या परिस्थितीनं संंत्रस्त झालेली संवेदनशील, विचारी माणसंही हतबल झालेली आहेत. त्यांनीही मूक राहून ‘जे जे होईल ते ते पाहावं’ अशी भूमिका स्वीकारली आहे. खरं तर या सगळ्या भवतालाचे पडसाद कलेतून, साहित्य, चित्रपट, नाटक आदी माध्यमांतून उमटायला हवे होते. पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अघोषित गळचेपीमुळे सगळेच हवालदिल झालेले आहेत. किंवा मग काहींचं स्वार्थी मौन तरी याला कारणीभूत आहे.
या पार्श्वभूमीवर ‘इथेच टाका तंबू’ हे दत्ता पाटील लिखित आणि सचिन शिंदे दिग्दर्शित वर्तमान वास्तवावर थेटपणे नाही, तरी आडवळणानं काही भाष्य करू इच्छिणारं नाटक येणं ही वार्याची सुखद झुळुक येण्यासारखीच गोष्ट आहे. म्हटलं तर ही एका भुरट्या चोराची आणि त्या चोरीचा तपास करणार्या पोलिसांची गोष्ट आहे. पण तिच्या पोटात आजचं वर्तमान आणि त्याबद्दलची खदखद व्यक्त झाली आहे. नाशिकमध्ये गोवर्धन नावाचा एक भुरटा चोर चोरीच्या उद्देशानं एका घरात घुसतो. त्याची बायको गीता हीसुद्धा त्याची साथीदार आहे. एखादं बडं घबाड मिळालं की त्या पैशांतून आपलं आयुष्य मार्गी लागेल आणि मग चोरीचा हा धंदा कायमचा सोडता येईल असा त्यांचा मनसुबा असतो. पोलिसांना या चोरीचं सीसीटीव्ही फुटेज मिळतं आणि या चोरीवर झगझगीत प्रकाश पडतो. मात्र, यातली गमतीची गोष्ट अशी की, चोराला ते घर कवी नारायण सुर्वेंचं आहे हे कळल्यावर त्याला चोरीची नैतिक टोचणी लागून तो सगळा मुद्देमाल जशाचा तसा त्या घरात परत नेऊन ठेवतो. कवीच्या घरात चोरी केल्याचा ठपका आपल्यावर लोकांनी ठेवू नये या भयगंडाने आणि चोरी करतानाही काही नीतिमूल्यं पाळण्याच्या अट्टहासातून त्याने हे कृत्य केलेलं असतं. त्याची बायको गीता हिचा मात्र त्याच्या या कृतीला विरोध असतो. तिला कधी एकदा आपल्याला पैशांचं घबाड मिळतंय आणि आपण नॉर्मल आयुष्य जगू लागतो असं झालेलं असतं. त्यामुळे ती चोरीचा माल परत करायला तीव्र विरोध करते.
इकडे पोलीस स्टेशनमध्ये या चोरीचा तपास करताना इन्स्पेक्टर राकेश गायधनी आणि हवालदार श्रीधर देशमुख यांच्यात चोरीच्या हेतूवरून चांगलेच मतभेद होतात. इन्स्पेक्टर राकेश यांचं म्हणणं असतं- हा भुरटा चोर आहे आणि त्याने मुद्देमाल परत आणून दिलाय त्या अर्थी या केसमधली हवाच निघून गेलीय. मात्र, हवालदार देशमुख यांचं म्हणणं असतं : हा कुणी नेहमीचा साधासुधा चोर नाहीए, तर तो नक्षलवादी आणि देशद्रोहीच असला पाहिजे. जो चोर संपत्तीच्या समान वाटपाचं तत्त्वज्ञान पाजळतो आहे त्याचाच अर्थ तो साधासुधा चोर नाहीए, त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. चोराने चोरी करावी, गप्प बसावं. पण हा समानतेच्या गप्पा झोडतोय… याचाच अर्थ त्याच्याकडून समाजाला, देशाला भविष्यात धोका आहे. तो बंडखोर आहे. आणि त्याने ज्या घरात चोरी केलीय, त्या घरात देवांच्या तसबिरींऐवजी कार्ल मार्क्स, आंबेडकर, गांधी, कुसुमाग्रज अशांच्या तसबिरी आहेत. हे लेखक, कवीलोक देशाला नको ते तत्त्वज्ञान शिकवतात आणि मग लोक बंड करून उठतात. या सगळ्या गोष्टींचा विचार त्या चोरावर कारवाई करताना व्हायला हवा. आपल्या स्मृती-पुराणांत सगळे वैज्ञानिक शोध आपल्याकडेच लागलेत हे साधार सांंगितलेलं असताना त्यावर हे लोक शंका घेतात. हे चुकीचंय असं हवालदाराचं म्हणणं आहे.
दुसरीकडे गोवर्धनही आपली भूमिका गीताकडे स्पष्ट करताना- ‘आपल्यातल्या चंगळवादाला (गीता ज्यांच्याकडे घरकाम करते त्या) अपूर्वाताईंनी आपल्या मनात पेरलेली भौतिक सुखांची स्वप्नं कारणीभूत आहेत,’ हे उलगडून सांगतो. आपली सामान्य स्वप्नंही पुरी होत नाहीत याला परिस्थिती जबाबदार आहे, आपण नाही, हे तो तिला परोपरीनं पटवून देऊ पाहतो. नारायण सुर्वेंसारखा अनाथ कवी आपल्या अभावग्रस्ततेवर आपल्या सर्जनशील कवित्वानं मात करतो; आपल्याला ते जमत नाही, ही आपल्यातली उणीव आहे. म्हणूनच अशा कवींचा आपण आदर करायला हवा असं तो म्हणतो. त्याच्या या लेक्चरबाजीनं गीता हळूहळू त्याचं म्हणणं पटवून घ्यायला लागते. तिलाही कवी नारायण सुर्वेंची कविता पटू लागते. परत जाताना गोवर्धनने लिहिलेला माफीनामा ही त्याने केलेली कविताच आहे असं तिचं म्हणणं पडतं.
लेखक दत्ता पाटील यांनी एका वेगळ्याच पठडीतलं, आजच्या वर्तमानावर उपहासात्मक भाष्य करणारं हे नाटक काही एका तळमळीनं लिहिलं आहे. त्यासाठी त्यांनी वापरलेली कल्पना अगदी भन्नाट आहे. नावीन्यपूर्ण आहे. यातली पात्रं एकेका विचारांचं प्रतिनिधित्व करतात आणि अत्यंत ठाशीवपणे सामोरी येतात. गोवर्धन चोर असला तरी काही नैतिक मूल्यं पाळणारा आहे. आपल्या अभावग्रस्त जिण्याला तो कंटाळला असला तरी काय वाट्टेल ते करून पैसा मिळवायचाच याला त्याचा विरोध आहे. गीता ही एक सर्वसामान्य स्त्री आहे. तिची स्वप्नं सीमित आहेत. ती कोणत्याही मार्गाने पुरी व्हायला हवीत या विचारांची ती आहे. अर्थात तिलाही काही फार मोठा हव्यास नाहीए. पण तिची साधी स्वप्नंही पुरी होत नाहीत याने ती कावली आहे. इन्स्पेक्टर राकेश हे एक समतोल विचारांचे गृहस्थ आहेत. व्यवस्थेचा बडगा आणि बाहेरील वस्तुस्थिती यांचा सम्यक विचार ते करू शकतात. हवालदार मात्र व्यवस्था, सत्तापक्ष आणि पुराणमतवादी विचारांचा कट्टर समर्थक आहे. म्हणूनच त्याला गोवर्धनमध्ये व्यवस्थेला धोका असल्याचं जाणवतं. म्हणूनच प्राणपणाने तो त्याला विरोध करू पाहतो आणि हळूहळू त्यातून उघडा पडत जातो. ही वैचारिक, भौतिक लढाई हाच या नाटकाचा प्राण आहे. आणि लेखक दत्ता पाटील यांनी तो ठोसपणे मांडला आहे. प्रसंगनिर्मिती, व्यक्तिरेखाटन, संवादरचना आणि त्यातून आपल्याला जे म्हणायचं आहे त्यावरदेखील त्यांची पक्की हुकुमत जाणवते. त्यामुळेच आजच्या परिस्थितीवर ते जळजळीत भाष्य करू शकलेयत. त्यासाठी फ्लॅशबॅक पद्धतीनं त्यांनी नाटकाची रचना केलीय. म्हटलं तर हे चर्चानाट्य आहे. पण ती केवळ कोरडी चर्चा नाहीए.
दिग्दर्शक सचिन शिंदे यांनी नाटकाची जातकुळी ओळखून त्याची सादरीकरणाची पद्धत ठरवलीय. घरातली चोरी आणि त्या अनुषंगाने तपास यांच्यातला भेद दाखवण्यासाठी पारदर्शी घर आणि त्या बाहेरचा भोवताल अशी विभागणी त्यांनी केली आहे. याकामी त्यांना नेपथ्यकार विक्रम नन्नवरे आणि प्रसाद चिने पाटील यांनी केलेल्या अनोख्या नेपथ्यरचनेची साथ मिळाली आहे. जेणेकरून ते प्रत्यक्ष चोरी आणि त्याचा तपास यांतलं अंतर दाखवू शकले आहेत. हे विचारांचं नाटक आहे ही खूणगाठ पक्की बांधूनच त्यांनी नाटकाची पिंडप्रकृती ठरवली आहे. त्यामुळे नाटकाचा आशय थेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. चपखल पात्ररचनेतही त्यांनी बाजी मारली आहे. त्यामुळे ते ईप्सित परिणाम साध्य करू शकले आहेत. प्रणव सपकाळे आणि निखिल मारणे यांच्या प्रकाशयोजनेनं आवश्यक ती वातावरणनिर्मिती केली आहे. ऋषिकेश शेलार यांचं संगीत आणि ऋषिकेश गांगुर्डे यांच्या पार्श्वसंगीताने आपली कामगिरी चोख बजावली आहे. अनिकेत खरे आणि कविता देसाई यांच्या वेशभूषेनं पात्रांना बाह्यरूप पुरवलं आहे.
यातल्या सगळ्याच कलाकारांची कामं अप्रतिम झाली आहेत. ओंकार गोवर्धन यांचा नैतिक मूल्यं मानणारा, सजग भुरटा चोर लोभस, तितकाच सुसंस्कृत आहे. त्याला भोवतालाचं भान आहे. आपल्यावर परिस्थितीनं आणलेली पाळी आणि तिच्याशी झगडताना त्याची होणारी कुतरओढ, त्याचवेळी समाजस्थितीबद्दलची त्यांची जाण उच्चतम दर्जाची आहे. आणि त्यांनी ती परिणामकारक रीतीनं दाखवली आहे. अश्विनी कासार यांची गीता एक सामान्य स्त्री या नात्याने वाट्याला आलेल्या भोगांनी कासावीस झालेली आहे. तिला इतरांसारखंच सरळसोट सामान्य आयुष्य जगायचंय. पण तिची ही साधी इच्छाही पुरी होत नाही, याने ती संत्रस्त झालेली आहे. तिला मूल्यंबिल्यं कळत असली तरी त्याने पोट भरता येत नाही हे पक्कंच माहीत आहे. म्हणूनच ती गोवर्धनला चोरीसाठी बळजोरी करू पाहते. यातल्या वैविध्यपूर्ण भावच्छटा अश्विनी कासार यांनी उत्कटतेनं दाखवल्या आहेत. उमेश जगताप यांचा कट्टरतावादी, पुराणमत प्रचारक, सत्तापक्षाचा खंबीर पाठीराखा हवालदार श्रीधर देशमुख अफलातून. भूमिकेत शिरणं म्हणजे काय, याचा वस्तुपाठच त्यांनी सादर केला आहे. आपले विचार वरिष्ठांना पटवून देण्याकामी ते पराकाष्ठा करतात. पण त्यातूनच ते अधिकाधिक उघडेही पडत जातात. अमेय बर्वे यांनी इन्स्पेक्टर राकेश गायधनींच्या रूपात सहृदयी, समतोल विचारांचा, समाजवास्तवाचं भान असणारा पोलीस अधिकारी आपला उचित आब राखून उभा केला आहे. हवालदाराबरोबरची त्यांची वैचारिक जुगलबंदी पाहण्यासारखी आहे.
एकुणात आजच्या वास्तवाला आरसा दाखवणारं हे नाटक प्रत्येकानं पाहायलाच हवं असं आहे.
