मुंबई : ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ ही म्हण खोटी ठरवत तीन मित्रांची धमाल दाखविणारा ‘ऑल इज वेल’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी २७ जूनपासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर कलाकार व तंत्रज्ञांच्या उपस्थितीत नुकताच प्रकाशित झाला. याप्रसंगी निखळ हास्याची मेजवानी देणारा हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास दिग्दर्शक योगेश जाधव यांनी व्यक्त केला.
तीन मित्रांची धमाल केमिस्ट्री आणि इतर कलाकारांचा मजेशीर अंदाज ‘ऑल इज वेल’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रदर्शन सोहळ्यात बोलताना निर्माते अमोद मुचंडीकर, वाणी हालप्पनवर, तसेच सहनिर्माते मल्लेश सोमनाथ मरुचे, विनायक पट्टणशेट्टी म्हणाले की, ‘काही तरी वेगळे करण्याच्या उद्देशाने आम्ही एकत्र आलो. प्रेक्षकांना धमाल करता येईल अशा कथानकाच्या शोधात असताना लेखक प्रियदर्शन जाधव, दिग्दर्शक योगेश जाधव आणि कार्यकारी निर्माते संजय ठुबे यांच्या सहकार्याने हा धमाल विषय आम्ही आणला आहे.
हा चित्रपट म्हणजे सहकुटुंब अनुभवायला मिळणारी हास्याची मेजवानी असून मनोरंजनाची अफलातून पर्वणी असणार आहे.’ काही दिवसांपूर्वीच ‘ऑल इज वेल’ या चित्रपटाचे एक मजेदार पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यानंतर आता चित्रपटाचा धमाल ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे, रोहित हळदीकर, सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर या कलाकारांची जमून आलेली उत्तम भट्टी काही तरी धमाल घडवणार हे ट्रेलरवरून आपसूकच जाणवत आहे. ‘ऑल इज वेल’ चित्रपटाचे दिग्दर्शन योगेश जाधव, तर लेखन प्रियदर्शन जाधव यांनी केले आहे. तर कार्यकारी निर्माते संजय ठुबे आहेत. संगीत चिनार-महेश,अर्जुन जन्या यांचे आहे.
छायांकन मयुरेश जोशी, संकलन अथश्री ठुबे, नृत्य दिग्दर्शक राजेश बिडवे, कला दिग्दर्शन नितीन बोरकर, साहसदृश्ये अजय ठाकूर, वेशभूषा किर्ती जंगम, रंगभूषा अतुल शिधये यांची आहे. तर गीतकार मंदार चोळकर असून गायक रोहित राऊत, गायिका अपेक्षा दांडेकर यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत.