मुंबई : मराठी चित्रपटांमध्ये गुणवत्ता, नाविन्य व अभिनयाची कमतरता नाही. मात्र हे चित्रपट नव्या पिढीपर्यंत आणि विशेषतः ‘जेन-झी’ प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यात मराठी चित्रपटसृष्टी कमी पडत आहे. ही ‘मिसिंग लिंक’ भरून काढण्यासाठी राज्य सरकार थेट मराठी चित्रपटाच्या निर्मितीत सहभागी होणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी मंगळवारी केली.
प्रभादेवीतील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळ व अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. मराठी चित्रपटाचा ‘आत्मा’ कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, व्हिज्युअल इफेक्ट्स व उत्तम निर्मिती मूल्यांचा वापर करून नव्या पिढीला आकर्षित करणारा चित्रपट तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
चित्रपट निर्मितीइतकाच स्क्रीन, वितरण व प्रेक्षकवर्गाचाही अभ्यास आवश्यक आहे. यासाठी व्यवहार्य मॉडेल तयार झाल्यास राज्य सरकार गुंतवणूकदार म्हणून भूमिका घेईल, असे शेलार यांनी स्पष्ट केले. अशा प्रयोगाचा आर्थिक भार केवळ निर्मात्यावर पडू नये, यासाठी सरकारनेही हातभार लावावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दक्षिण भारतीय चित्रपटांना स्थानिक प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भावनिक प्रतिसादाचा दाखला देत मराठी चित्रपटांसाठीही नव्या पिढीशी भावनिक नाते जोडणारा प्रेक्षकवर्ग उभा करण्याची गरज असल्याचे शेलार म्हणाले. मराठी ‘जेन-झी’ प्रेक्षक अन्य भाषांतील मनोरंजनाकडे वळण्याऐवजी मराठी चित्रपटांकडे आकर्षित व्हावा, यासाठी आशयासोबतच सादरीकरण आणि तंत्रज्ञानातही मोठा बदल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. या वेळी उप व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजनीकर, महेश मांजरेकर, अशोक राणे, मेघराज राजेभोसले, राजेश मापुस्कर, सुशांत शेलार तसेच अन्य चित्रकर्मी उपस्थित होते. ….
‘एआय’ला संधी बनवा कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल प्लॅटफॉर्म व बदलते तंत्रज्ञान ही चित्रपटसृष्टीसमोरील आव्हाने असली तरी त्यांचे संधीत रूपांतर करण्याची गरज आहे. ‘एआय’चा चित्रपट निर्मितीत नेमका उपयोग कसा करता येईल, त्यातील संधी व आव्हाने काय आहेत, यावर प्रात्यक्षिकांसह चर्चासत्रे व कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचनाही शेलार यांनी दिल्या.
संपूर्ण परिसंस्था चित्रनगरी केवळ चित्रीकरणासाठी जागा उपलब्ध करून देणारे केंद्र न राहता चित्रपटसृष्टीची संपूर्ण परिसंस्था उभारण्याच्या दिशेने काम करत असल्याचे फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी सांगितले. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही व ओटीटीमुळे चित्रपट निर्मितीपासून त्याचा आनंद घेण्याचे चित्र बदलले आहे. या बदलातून निर्माण होणाऱ्या संधींचा फायदा घेण्यासाठी पायाभूत सुविधा, कौशल्य विकास, तंत्रज्ञान आणि ‘ईझ ऑफ डुईंग बिझनेस’वर भर दिला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
